भाजपाचे माजी नगरसेवक भरत चव्हाण यांची मागणी
ठाणे : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) २५ टक्के आरक्षित जागांसाठी पालकांच्या उत्पन्नाची अट एक लाख रुपयांवरुन अडीच लाख रुपयांपर्यंत वाढवावी. राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेनुसार `आरटीई’ प्रवेशासाठीही अडीच लाख रुपयांची उत्पन्नमर्यादा ठेवावी, अशी आग्रही मागणी भाजपाचे माजी ज्येष्ठ नगरसेवक भरत चव्हाण व भाजयुमोचे प्रदेश सचिव ओमकार चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
दरम्यान, या प्रश्नाकडे विधिमंडळाच्या अधिवेशनात राज्य सरकारचे लक्ष वेधून धोरणात्मक निर्णय घेण्याबाबत पाठपुरावा करण्याची विनंती भाजपाचे आमदार निरंजन डावखरे यांच्याकडेही करण्यात आली आहे.
`आरटीई’ नुसार मुलांच्या प्रवेशासाठी पालकांचे उत्पन्न एक लाख रुपयांपेक्षा कमी असल्याची अट ठेवण्यात आली आहे. तर राज्य सरकारच्याच लाडकी बहीण योजनेत अर्ज पात्र ठरण्यासाठी लाभार्थी महिलांच्या कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असल्याची अट आहे. `आरटीई’ नुसार अर्जासाठी राज्य सरकारच्या महसूल विभागाकडून उत्पन्नाचा दाखला घ्यावा लागतो. मात्र, एक लाखांपेक्षा कमी उत्पन्नाचा दाखला मिळविण्यासाठी अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे यंदा अनेक कुटुंबातील गरजू विद्यार्थ्यांना `आरटीई’ नुसार प्रवेश मिळविता आला नाही, याकडे माजी नगरसेवक भरत चव्हाण व ओमकार चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष वेधले.