पूर्ण रस्त्यांची पुन्हा निविदा; अधिकाऱ्याला बडतर्फ करा

भाजपा जिल्हाध्यक्षांची आयुक्तांकडे मागणी

ठाणे : उथळसर प्रभाग समिती हद्दीत दोन ते तीन वर्षांपूर्वी पूर्ण झालेल्या कॉंक्रिट रस्त्यांच्या कामाची पुन्हा निविदा काढून कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या महापालिका अधिकाऱ्याला बडतर्फ करावे. तसेच संबंधित निविदा तातडीने रद्द करावी, अशी मागणी भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

धोबी आळी, चरई, दगडी शाळा परिसर, खारकर आळी, महागिरी, गवळी पाडा, खान चाळ, कडवा गल्ली, जोगिला मार्केट, उथळसर, मनोरपाडा, सामंतवाडी, आंबेडकर रोड, लॉरी स्टॅण्ड, पिंपळपाड, भोईर चाळ आदी भागांमध्ये सध्या कॉंक्रीट रस्ते तयार करण्यात आलेले आहेत. या भागातील रस्त्यांची कामे सुमारे दोन ते तीन वर्षांपूर्वी करण्यात आली असून, सध्या या भागातील रस्ते सुस्थितीत आहेत. तसेच त्यांची बिलेही संबंधित कंत्राटदारांना अदा करण्यात आलेली आहेत. मात्र, या भागातील रस्त्यांची यूटीडब्यूटी पद्धतीने कॉंक्रिटीकरण करण्याच्या कामासाठी निविदा मागविण्यात आल्या आहेत. पूर्ण झालेल्या कामांची पुन्हा निविदा काढून कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार करण्याचा महापालिकेतील काही अधिकाऱ्यांचा डाव आहे, असा आरोप भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांनी केला.

ठाणे महापालिकेच्या तिजोरीत निधीची आर्थिक चणचण असतानाही, ४ मार्च रोजी संबंधित रस्त्यांच्या कामाची पुन्हा निविदा जारी करण्यात आली. या कामासाठी १२ मार्चपर्यंत ऑनलाईन निविदा मागविण्यात आल्या आहेत. या कामासाठी पाच कोटी रुपयांची तरतूद आहे. या प्रकाराची आपण गंभीर दखल घेऊन चौकशी करावी. तसेच या चौकशीनंतर निविदा जारी करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यावर बडतर्फीची कारवाई करावी. या कारवाईमुळे पुन्हा असा प्रकार करण्यास कोणीही अधिकारी धजावणार नाही, अशी मागणी भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांनी केली आहे.