ठाणे : पूर्व ठाण्यात भरवस्तीत देहविक्रीचा व्यापार करणाऱ्या लॉजला टाळे ठोकण्याची कारवाई करण्याची मागणी महिलांनी वनमंत्री गणेश नाईक यांच्या जनता दरबारात केली असून पोलिस कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ठाणे पूर्व भागात स्टेशन परिसरात गुरुकृपा आणि धनराज हे दोन लॉज आहेत. या लॉजमध्ये बेकायदेशीरपणे देहव्यापार सुरु असून अल्पवयीन मुली आणि वारांगना रस्त्यावर उभ्या राहून लज्जास्पद हावभाव करतात, त्यामुळे महिला आणि पुरुषांना देखिल त्या भागातून चालणे कठीण झाले आहे. या दोन लॉजमध्ये ग्राहक यावेत यासाठी त्या महिला रस्त्यावर उभ्या राहून सावज शोधत असतात, त्यामुळे या भागातून कामावर जाणाऱ्या महिला आणि मुलींकडे देखिल वेगळ्या नजरेने पाहिले जात आहे. कोपरी पोलिस कोणत्याही प्रकारची कारवाई करत नसल्याने दिवसेंदिवस या भागात वारांगनांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे या दोन लॉजच्या विरोधात कारवाई करून पूर्व ठाण्यातील महिलांना दिलासा द्यावा, अशी मागणी सुवर्णा अवसरे, मंगला शर्मा आणि भारती सावंत या महिलांनी वनमंत्री गणेश नाईक आणि माजी नगरसेवक भरत चव्हाण यांच्याकडे केली आहे.
वनमंत्री श्री.नाईक हे आमच्या मागणीकडे लक्ष देऊन पूर्व भागातील लॉजमध्ये सुरु असलेला वेश्याव्यवसाय बंद करण्यासाठी पोलिसांना आदेश देतील, अशी अपेक्षा तक्रारदार महिलांनी केली आहे.