ठाणे : श्री कौपिनेश्र्वर सांस्कृतिक न्यास आयोजित स्वागत यात्रेचे यंदाचे रौप्य महोत्सव असल्याने न्यासाने २८ मार्चला उपवन येथे तर २९ मार्चला मासुंदा तलाव येथे गंगा आरतीचे आयोजन केले आहे. त्यासाठी वाराणसीहून पंडीतही येणार असल्याने ठाणेकरांसाठी ही पर्वणी ठरणार आहे.
ठाण्यात श्री कौपिनेश्वर सांस्कृतिक न्यासातर्फे नववर्षानिमित्त महिनाभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष करुन तरुणांचा सहभाग वाढविण्याकरिता आयोजकांकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत. महाविद्यालयांमध्ये विविध व्याख्यानांचे आयोजन करत आहेत. तसेच युवा दिनानिमित्त न्यासाकडून युवा दौडचे आयोजन देखील करण्यात आले होते. या युवा दौडमध्ये मोठ्या संख्येने युवक सहभागी झाले होते.
१२ मार्च रोजी ‘भारत २०४७- युवकांचा सहभाग’ याविषयावर व्याख्याते दिपक करंजीकर यांचे व्याख्यान होणार आहे. तर, शनिवार, २२ मार्च रोजी संध्याकाळी ६ वाजता श्री कौपिनेश्वर मंदिर प्रांगणात नृत्यधारा हा कार्यक्रम होणार आहे. यामध्ये ठाण्यातील विविध नृत्य संस्थांचे सादरीकरण असणार आहे. तर, रविवार, २३ मार्च रोजी संध्याकाळी ६ वाजता भव्य सांगितीक कार्यक्रम होणार आहे. तर, यंदा वाराणसी येथील पंडितांकडून भव्य गंगा आरतीची अनुभूती ठाणेकरांना अनुभवता येणार आहे. २८ मार्च रोजी उपवन येथे तर, २९ मार्च रोजी मासुंदा तलाव येथे ही गंगा आरती होणार आहे. मासुंदा तलाव येथे होणार्या गंगा आरतीसह दरवर्षी प्रमाणे दीपोत्सव देखील होणार असल्याची माहिती न्यासाने दिली आहे.