२५हून जास्त प्रवासी गंभीर जखमी
चाकूर: एका दुचाकीस्वाराला चुकविताना अहमदपूरहून लातूरकडे जाणारी एसटी बस दुभाजकावरून पलीकडे जाऊन पलटी झाली. या भीषण अपघातात २५ प्रवासी गंभीर जखमी झाले. ही घटना आज (दि.३) दुपारी १. ३० च्या सुमारास नांदगाव पाटीजवळ घडली. या अपघातात काही प्रवाशांचे हात आणि बोटे तुटली आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, ही बस (एमएच २० बीएल १६१३) अहमदपूर डेपोची असून अहमदपूरहून लातूरकडे जात होती. यावेळी नांदगाव पाटीजवळ पुढे चाललेल्या एका दुचाकी स्वाराला चुकविताना चालकाचा बसवरील ताबा सुटला. त्य़ामुळे बस दुभाजकावरून पलिकडच्या लेनवर जाऊन पलटी होऊन ७० फूट फरफटत गेली. या अपघातात जवळपास २० ते २५ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. काही प्रवाशांच्या डोक्याला मार लागला. काहींचा हात आणि हाताची बोटे तुटून रस्त्यावर पडली होती. जखमींना रुग्णवाहिकेने लातूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी राज्य परिवहन महामंडळाचे अधिकारी आणि चाकूर पोलिस दाखल झाले होते. तत्काळ बचाव कार्य सुरू करण्यात आले होते.
राष्ट्रीय महामार्ग झाल्यापासून चाकूर तालुक्यातील आष्टामोड आणि नांदगाव पाटी हे स्पॉट अपघाताचे डेंजर झोन म्हणून ओळखले जाऊ लागले आहेत. आतापर्यंत झालेल्या अपघातात अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे.