आतकोली प्रकल्पाची निविदा प्रक्रिया वादात

ठामपाच्या कचरा प्रकल्पाला सतराशे विघ्नं!

ठाणे: भिवडी येथील आतकोलीच्या जागेवर शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्याचा प्रकल्प मार्गी लागावा यासाठी ठाणे महापालिका शर्थीचे प्रयत्न करत असताना आता पुन्हा हा प्रकल्प निविदा प्रक्रियेमुळे वादात सापडला आहे.

कचरा संकलन आणि वाहतुकीसाठी पालिकेने तब्बल २,७०० कोटींची फेरनिविदा काढताना त्यात १० वर्षे अनुभवाची अट शिथिल करून पाच वर्षे केली आहे. मात्र पाच वर्षे अनुभव असलेल्या ‘सायिस्कर’ ठेकेदाराला हा ठेका १० वर्षांसाठी दिला गेला आहे. त्यामुळे आता काँग्रेसही या प्रकल्पाविरोधात मैदानात उतरली असून निविदा रद्द करण्याची मागणी पालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडे केली आहे.

ठाणे पालिका क्षेत्रामध्ये दररोज सुमारे एक हजार मेट्रीक टन इतका कचरा निर्माण होतो. यात ६० टक्के ओला तर ४० टक्के सुका कचरा आहे. ठाणे महापालिकेकडे स्वतःची कचराभूमी नाही. दिवा येथील डम्पिंग ग्राऊंड बंद करण्यात आले आहे. तर सीपी टँक येथे संकलीत होणार्‍या कचरा साठवणुकीची क्षमता केव्हाच संपली आहे. वागळे येथे हा कचरा संकलीत होत असल्यामुळे थेट उपमुख्यमंत्र्यांनाच येथील रहिवाशांच्या नाराजीचा सामना करावा लागत आहे. दुसरीकडे डायघर येथे कचर्‍यापासून वीज निर्मितीचा प्रकल्प सुरू झाला असला तरी त्याची क्षमता वाढलेली नाही. त्यामुळे गेल्या वर्षभरापासून ठाणे पालिकेची आणि ठाणेकरांची कचराकोंडी होत आहे.

या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने भिवंडी येथील आतकोली भागात ३४ हेक्टर क्षेत्रफळाचा भुखंड ठाणे महापालिकेला कचरा प्रकल्पासाठी दिला आहे. ठाणे महापालिकेच्या हद्दीबाहेरचा हा भुखंड असून त्याला तेथील राजकीय विरोध होत आहे. हा राजकीय विरोध शमवण्यासाठी महापालिकेच्या अधिकार्‍यांपासून ठाण्यातील सत्ताधारी पक्ष प्रयत्न करत आहेत. त्यातूनच फेरनिविदा काढण्यात आली असल्याचा आरोप आता होत आहे. पालिकेने आधी काढलेल्या निविदेत ठेकेदाराला १० वर्षे कामाच्या अनुभवाची अट घातली होती. पण नवीन निविदेत ही अट मागे घेत त्याची मुदत केवळ पाच वर्षे करण्यात आली आहे. सुरुवातीला हा प्रकल्प २३०० कोटींचा होता असे कळते. त्यावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी आक्षेप घेतला होता. तर आता २७०० कोटींची ही निविदा कोणत्या आधारे ठरवण्यात आली, असा प्रश्न काँग्रेसनेही उपस्थित केला आहे.

ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट घेत महापालिकेने मंजूर आकृतीबंध आस्थापनेचा घनकचरा निर्मूलन व्यवस्थापनासाठी रिक्त असलेल्या पदांवर तांत्रिक ज्ञान असलेले अधिकारी घेतले पाहिजेत तसेच भविष्यात ठाणे शहराची लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढणार असल्याने घनकचर्‍यामध्ये देखील वाढत्या लोकसंख्येच्या अनुषंगाने वाढ होणार आहे, त्यामुळे २७०० कोटींची ही रक्कम कोणत्या आधारे काढली, असा जाब विचारला आहे. यासंदर्भात ठाणे काँग्रेसने पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली.

घनकचरा प्रकल्पाची निविदा राबवताना नेमणूक केलेल्या सल्लागारांनी सुमित फॅसिलिटीज आणि जे व्ही एन्व्हायरो या दोन कंपन्या निविदेत कशा बसतील याची काळजी घेतली असल्याचा आरोप होत आहे. या दोनपैकी एक कंपनी राजकीय वरदहस्त असलेल्या ठेकेदाराची असल्याचा संशय व्यक्त होत आहे.

कचरा निर्मूलनासह कचर्‍यावर प्रक्रिया करून त्यापासून खतनिर्मिती करणार्‍या ठाणे क्लीन एन्व्हायरमेंट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची २५ कोटींची थकबाकी ठाणे महानगरपालिका अद्याप देऊ शकलेली नाही. यासह अनेक त्रुटी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त सौरभ राव यांना निदर्शनास आणून दिल्या आहेत.

अनागोंदी आणि मनमानी कारभारामुळे महापालिका डबघाईला आली आहे, असा आरोप करत ही निविदा रद्द करून वार्षिक तत्त्वावर निविदा काढण्यात यावी. तसे न झाल्यास काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून महापालिकेसमोर तीव्र आंदोलनाचा इशारा काँग्रेसने दिला आहे.