गैरहजर अधिकाऱ्यांना सरनाईकांनी धरले धारेवर

ठाण्यातील आणि विशेष करून घोडबंदर पट्ट्यातील विविध विकासकामांचा आढावा घेण्यासाठी बोलावण्यात आलेल्या बैठकीत ठाणे महापालिकेच्या शहर विकास विभागातील अधिकारी आणि इतर अधिकारी गैरहजर राहिले. राज्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी अधिकाऱ्यांच्या या कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

१५ दिवसांपूर्वी बैठकीचे नियोजन करण्यात येऊनही अधिकारी गैरहजर राहिल्याने अशा महत्वाच्या बैठकीला गैरहजर राहणारे अधिकारी विकासकांकडून हप्ते गोळा करण्यासाठी मात्र बरोबर उभे राहतात या शब्दात त्यांनी पालिका अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले.

ठाणे महापालिका क्षेत्रातील आणि विशेष करून घोडबंदर पट्ट्यातील विकासकामांचा आढावा घेण्यासाठी शुक्रवारी ठाणे महापालिकेच्या कै.अरविंद पेंडसे सभागृहात राज्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी महत्वाची बैठक आयोजित केली होती. या बैठकीला एमएमआरडीए, मेट्रो, ठाणे महापालिकेचे शहर विकास विभागाचे तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलावण्यात आले होते. मात्र बैठक सुरु होऊनही बरेच अधिकारी गैरहजर असल्याचे मंत्री सरनाईक यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी अधिकाऱ्यांच्या या कारभाराबाबत बैठकीतच संताप व्यक्त केला. या बैठकीला परिवहन मंत्री सरनाईक हे वेळेवर उपस्थित होऊनही महापालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, शहर विकास विभागातील अधिकारी हे उपस्थित न राहिल्याने किंबहुना काही अधिकारी हे उशीराने हजर झाल्याने सरनाईक यांनी या अधिकाऱ्यांची चांगलीच कान उघडणी केली. विकासकांचे हप्ते गोळा करायला थांबला होता का?, आम्ही मुर्ख आहोत का? विकासकासाठी पायघड्या किती घालणार असे खडे बोल त्यांनी अधिकाऱ्यांना यावेळी सुनावले. तसेच जे अधिकारी गैरहजर होते, त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेशही मंत्री सरनाईक यांनी यावेळी दिले.

बोरीवडे येथील मैदानाच्या विकासाचा नारळ फुटला असला तरी यातील अवघी ६० टक्केच जागा महापालिकेच्या ताब्यात आली आहे. मागील तीन वर्षापासून भाईंदर पाडा येथील रस्त्याचे रुंदीकरण थांबले असून आगरी कोळी भवनाचे काम मागील सात वर्षांपासून सुरु असून ते देखील अद्याप पूर्ण झाले नसल्याची गंभीर माहिती या बैठकीतून समोर आली आहे. या रखडलेल्या कामांबाबत परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी अधिकाऱ्यांवर संताप व्यक्त केला. येत्या १५ मार्चपर्यंत या कामातील अडथळे दूर करुन ही कामे सुरु करण्याचे निर्देश सरनाईक यांनी यावेळी दिले.

भाईंदर पाडा येथील अंतर्गत रस्त्याच्या कामातही अद्याप येथील नागरीकांच्या पुनर्वसनाचा मुद्दा असल्याने त्या रस्त्याचे कामही होऊ शकले नसल्याची माहिती त्यांनी दिली. मात्र हा रस्ता मागील तीन वर्षांपासून रखडला असल्याने आता त्याचे काम झाले नाही तर पावसाळ्यात होणाऱ्या वाहतुक कोंडीमुळे त्याचे बोल आम्हाला खावे लागणार असल्याचा संताप सरनाईक यांनी व्यक्त केला. तसेच या भागातील अनेक मिसिंग लिंकची कामे देखील रखडल्याने त्यांनी पालिका अधिकाऱ्यांची कानउघडणी केली. शिवाय याच भागातील आगरी कोळी भवनचे काम हे मागील सात वर्षापासून सुरु असून ते देखील अद्याप मार्गी लागलेले नाही, परंतु पुढील दोन महिन्यात त्याचे काम पूर्ण करा असे आदेशही त्यांनी यावेळी दिले. याच भागात विकासकाला टीडीआर देऊन कित्येक वर्षे झाली तरी देखील त्या ठिकाणी कुंपण भिंत उभारण्यात का आली नाही? असा सवाल उपस्थित करीत शहर विकास विभागातील अधिकाऱ्यांना केवळ भुखंड ताब्यात घ्यायला वेळ मिळत नाही का? असे खडे बोलही त्यांनी सुनावले. याशिवाय कासारवडवली मार्केटचे भुमीपूजन होऊनही त्याचे काम मार्गी न लागल्याचे यावेळी स्पष्ट झाले. एकूणच या सर्व कामांचे नियोजन अडथळे येत्या १५ मार्चपर्यंत दूर करण्याचे निर्देश त्यांनी दिले असून त्यानंतर कामाला सुरवात करा असेही त्यांनी सांगितले.