भाईंदरपाड्यात राबवणार पॉड टॅक्सीचा पायलट प्रोजेक्ट

* भाईंदरपाडा मेट्रो स्टेशन ते विहंग हिल्स सर्कलपर्यंत प्रायोगिक प्रकल्प
* परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

ठाणे: ठाणे शहरातील वाहतूक कोंडीवर मार्ग काढण्यासाठी भविष्यात स्वयंचलित पॉड टॅक्सी प्रकल्प अनिवार्य ठरणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून प्रायोगिक तत्त्वावर घोडबंदर मार्गावरील भाईंदर पाडा मेट्रो स्टेशन ते विहंग हिल्स सर्कलपर्यंत पॉड टॅक्सीचा पायलट प्रोजेक्ट राबवण्यात येणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

ठाणे महापालिकेच्या क्षेत्रातील विविध विकासकामांच्या आढावा बैठकीप्रसंगी ते बोलत होते. अरुंद रस्ते आणि वाढती वाहनसंख्या यांचा विचार करता भविष्यात रस्त्यावरील वाहतुकीला मर्यादा येणार आहेत. त्यामुळे रोप-वे, पॉड टॅक्सी यासारख्या हवेतील वाहतूक व्यवस्थेला पर्याय नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून व केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली न्युट्राॅन ईव्ही मोबिलीटी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमार्फत बडोदा येथे चाचणी स्वरूपात स्वयंचलित उन्नत पॉड टॅक्सीचा प्रकल्प राबवला जात आहे. गुजरात दौऱ्यावर असताना या प्रकल्पाला मंत्री सरनाईक यांनी भेट देऊन त्याची पाहणी केली होती. दरम्यान अशाच प्रकारचा प्रकल्प तत्कालीन मुख्यमंत्री व सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बीकेसीमध्ये प्रायोगिक तत्वावर राबविण्यास मान्यता दिली आहे. त्याच धर्तीवर मीरा-भाईंदर येथील जे.पी. इन्फ्रास्ट्रक्चर ते शिवाजी महाराज पुतळा आणि ठाण्यातील घोडबंदर मार्गावरील भाईंदरपाडा मेट्रो स्टेशन ते विहंग हिल्स सर्कलदरम्यान स्वयंचलित पॉड टॅक्सीचा पायलट प्रोजेक्ट राबवला जाणार आहे. त्यासाठी महापालिकेतर्फे जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे. या प्रकल्पाचा सर्व खर्च संबंधित संस्था करणार असून त्यामध्ये सरकार अथवा महापालिकेला एक रुपया देखील खर्च करावा लागणार नाही.

हा प्रकल्प यशस्वी झाल्यास भविष्यात ठाणे आणि मीरा-भाईंदरमध्ये मेट्रोला सलग्न होईल अशा पद्धतीने विजेवर चालणाऱ्या स्वयंचलित पॉड टॅक्सीचे जाळे निर्माण करणे शक्य होणार आहे, असे प्रतिपादन मंत्री सरनाईक यांनी केले. या बैठकीमध्ये ठाणे शहरामध्ये महापालिकेच्या माध्यमातून सुरू असलेले जलतरण तलाव, स्मशानभूमी, उद्यान तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर विपश्यना केंद्र, लता मंगेशकर संगीत विद्यालय अशा विविध विकासकामांचा आढावा मंत्री सरनाईक यांनी घेतला.

काय आहे पॉड टॅक्सी?

पॉड टॅक्सी म्हणजे स्वयंचलित, चालकविरहित आणि इलेक्ट्रिक वाहतूक व्यवस्था. ही एक प्रगत आणि पर्यावरणपूरक वाहतूक व्यवस्था आहे. पॉड टॅक्सींना प्रवास करण्यासाठी समर्पित ट्रॅक बांधलेले असतात. या स्वायत्त गाड्यांमध्ये चार ते सहा प्रवासी बसण्याची क्षमता असते. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) बीकेसीत येण्या-जाण्यासाठी पॉड टॅक्सीचा पर्याय आणला आहे.
यमुना ऑथोरिटीने जगातल्या सर्वात मोठ्या पॉड टॅक्सी सेवेसाठी ८१० कोटी रुपयांचे बजेट मंजूर केले आहे.