सिव्हिल रुग्णालयात औषधोपचार आणि फिजिओथेरपीचे यशस्वी उपचार
ठाणे : पक्षाघाताचा झटका आल्यावर अनेकांच्या पायाखालची वाळू सरकते. या संकटातून आता बरे होणार नाही अशी भावना असली, तरी वेळेवर औषधोपचार आणि फिजिओथेरपी करणे खूप महत्वाचे ठरत आहे. ठाणे सिव्हील रुग्णालयात औषधोपचार आणि फिजिओथेरपीद्वारे चेहऱ्याच्या पक्षाघाताने (बेल्स पाल्सी) त्रस्त झालेल्या पाच रुग्णांच्या चेहऱ्यावर पूर्वीसारखे हसू उमटले आहे.
सध्या चेहऱ्याचा पक्षाघात (बेल्स पाल्सी) झालेले अनेक रुग्ण बघायला मिळत आहेत. मुळात पक्षाघात झाल्यावर पुढे आपले कसे होणार ही चिंता सतावते. आपण दुसऱ्यावर अवलंबून रहाणार या विवंचनेत असणाऱ्या रुग्णांसाठी ठाणे सिव्हील रुग्णालय आशेचे किरण ठरत आहे. गेल्या दोन महिन्यात चेहऱ्याचा पक्षाघात (बेल्स पाल्सी) झालेल्या पाच रुग्णांवर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.कैलास पवार, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धिरज महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी उपचार झाले असल्याची माहिती
फिजिओथेरपीस्ट डॉ. ज्ञानेश्वर सलगर यांनी दिली.
विषाणू संसर्ग, कमकुवत रोगप्रतिकार शक्ती, मधुमेह व रक्तदाब, अपघात आदी कारणांनी बेल्स पाल्सी कोणत्याही वयोगटातील स्त्री व पुरुषानां होऊ शकतो. चेहऱ्याच्या मज्जातंतूचा (फेशिअल नव्हऀ) मेंदूमधून निघून कानाच्या मागुन आपल्या चेहऱ्याला पाच भागात विभागुन चेहऱ्याचे हावभाव , डोळे व तोंडाच्या हालचाली नियंत्रणात ठेवते. बेल्स पाल्सी आजारात चेहऱ्याच्या मज्जातंतूंला होणाऱ्या सुजेमुळे चेहऱ्याचा लकवा होत असल्याचे ईएनटी स्पेशालिस्ट डॉ. सुरभी लुटे म्हणाल्या.
कानातील किंवा कानाभोवतील वेदना, कपाळावर आठ्या न पडणे, डोळे बंद न होणे अथवा डोळे कोरडे होणे, गालाचा फुगा केला की हवा एका बाजूला निसटणे, जेवताना अन्न व पाणी एका बाजूने तोंडातून बाहेर पडणे, अन्न गाल व दातामधील भागात साठून राहणे, चव बदलणे तोंड एका बाजूला वाकडे होणे ही लक्षणे आहेत.
एखाद्याला चेहऱ्याचा पक्षघात (बेल्स पाल्सी) झाला तरी घाबरून जायचे कारण नाही. वैद्यकीय उपचार व फिजिओथेरपीने साधारणपणे एक ते तीन महिन्यात कमी अधिक कालावधीत बरा होतो. रुग्णालयात च इलेक्ट्रीकल स्टिम्युलेशन देवून स्नायूंचे आकुंचन घडवून आणले जाते. सोबत घरी कपाळावर आठ्या पाडणे, डोळ्यांची उघड झाप करणे, गालाचा फुगा करणे, मेणबत्ती विझवणे, शिट्टी वाजवणे आदींनी उपचारांनी रुग्ण पूर्णपणे बरा होतो, अशी माहिती डॉ.कैलास पवार यांनी दिली.