अंबरनाथ: आज अखेर सहाव्या दिवशी अंबरनाथमधील कचराकोंडी दूर झाली असून कचरा उचलून नेल्याने कचऱ्याचे ढिगारे उचलले आहेत. कचरा उचलून नेणाऱ्या कंत्राटी कामगारांना वेतन न मिळाल्याचे कारण पुढे करत कचरा संकलन करणाऱ्या घंटागाडी कामगारांनी बंद पुकारला होता. त्यामुळे शहरात व इमारतीच्या खाली कचऱ्याचे ढीग साचले होते.
आज गुरुवारी अखेर सहा दिवसांनंतर घंटागाडी चा संप मिटला आहे. महाशिरात्रीत देखील शहरात कचऱ्याचे ढीग साचल्याने नागरिकांनी पालिकेला दूषणे दिली. अंबरनाथ शहरातील साधारण १६० मे टन घनकचरा व्यवस्थापनासाठी अंबरनाथ नगरपरिषदेने पुढील पाच वर्षासाठी नव्याने तब्बल ८० कोटी २५ लाख रुपयांचे टेंडर प्रसिद्ध केले आहे. हे काम समीक्षा कंपनीकडून केले जात आहे. मात्र टेंडरमधील अटी,शर्तीनुसार काम होत नसल्याचे कारण पुढे करत अंबरनाथ नगर परिषदेने मागील सहा महिन्यांचे बिल संबंधित ठेकेदारांना अदा केलेले नाही. त्यामुळे कामगारांचे पैसे दर महिन्याला त्यांच्या खात्यात ठेकेदाराने जमा केले आहेत. मागील एक महिन्याचा पगार न मिळाल्याने . कामगारांनी काम बंदचे हत्यार उपसले आहे. त्यामुळे तब्बल सहा दिवस शहरात कचरा साचलेला होता.
अखेर ठेकेदाराचे तीन महिन्याचे बिल अदा करण्याचे नगरपालिकेने मान्य केल्यानंतर व कामगारांचे थकलेला एक महिन्याचा पगार ठेकेदाराने दिल्यानंतर सहा दिवसानंतर घंटा गाडी सुरू झाल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.