१०० दिवसांच्या विशेष मोहिमेत अंतरिम मूल्यमापनात ठामपा प्रथम

ठाणे: राज्यस्तरीय, विभागस्तरीय व जिल्हास्तरीय प्रशासन हे लोकाभिमुख, गतिमान व पारदर्शक पद्धतीने चालावे याकरिता ७ जानेवारी, २०२५ ते १६ एप्रिल, २०२५ या कालावधीत राज्यात १०० दिवसांची कार्यालयीन सुधारणांची विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेच्या अंतरिम प्रगतीच्या मूल्यमापनामध्ये राज्यातील सर्व महानगरपालिका आयुक्त कार्यालयांमधून ठाणे महानगरपालिका आयुक्त कार्यालयास राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे.

या मोहिमेच्या अंतरिम प्रगतीचा आज, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्या उपस्थिती सह्याद्री अतिथीगृह येथे आढावा घेण्यात आला.

या अंतरिम प्रगतीच्या मूल्यमापनामध्ये राज्यातील सर्व महानगरपालिका आयुक्त कार्यालयांमधून ठाणे महानगरपालिका आयुक्त कार्यालयास राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे. त्याबद्दल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत देण्यात आलेले ‘अभिनंदन पत्र’ ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी स्वीकारले.

दिनांक १६ एप्रिल, २०२५ रोजी ही १०० दिवसांची विशेष मोहीम पूर्ण होणार आहे. ही मोहीम यापुढे अधिक व्यापक व प्रभावीपणे राबवून, आपल्या हातून अशीच नेत्रदीपक कामगिरी होत राहावी, अशी अपेक्षाही यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.

राज्यातील सर्व मंत्रालयीन विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव, आयुक्त, संचालक, पोलीस आयुक्त, विभागीय आयुक्त, पोलीस परिक्षेत्र महानिरीक्षक, उप महानिरीक्षक, जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त, पोलीस अधीक्षक व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कामगिरीचे कार्यालयांची संकेतस्थळे, सुकर जीवनमान, स्वच्छता, तक्रार निवारण, अधिकारी कर्मचारी प्रशिक्षण, सेवा विषयक बाबी, कृत्रीम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर (AI), नाविन्यपूर्ण उपक्रम, इत्यादी निकषांच्या आधारे मूल्यमापन करण्यात आले.