कळव्यात बीएसयुपी इमारतीच्या गाळ्यांमध्ये स्थानिकांची घुसखोरी

* ठामपा मालमत्ता विभागाची शोध मोहीम
* शटर कापून साहित्य जप्त

ठाणे: ठाणे महापालिकेच्या विविध प्रकल्पांत बाधित झालेले नागरिक गेल्या अनेक वर्षांपासून सदनिका आणि गाळ्यांच्या प्रतिक्षेत असताना कळव्यातील बीएसयुपीच्या इमारतीमध्ये असलेल्या गाळ्यांमध्ये चक्क स्थानिक नागरिकांनी घुसखोरी केल्याची गंभीर बाब समोर आली आहे.

ठाणे महापालिकेच्या स्थावर मालमत्ता विभागाच्या मालकीचे कळव्यातील महात्मा फुले नगर येथे सुकुर पार्कमध्ये बीएसयुपी इमारतीत अनेक गाळे आहेत. यापैकी १९ गाळ्यामध्ये काही स्थानिक नागरिकांनी घुसखोरी करीत आपले बस्तान बसविले असल्याचे पालिकेच्या निदर्शनास आले. पालिका अधिकाऱ्यांच्या पाहणी दौऱ्यात धक्कादायक बाब उघडकीस आल्यानंतर सहाय्यक आयुक्त राजेश सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली कटर ने टाळे कापुन शटर उघडले. काही गाळ्यामध्ये मंडप डेकोरेटर्सचे समान ठेवण्यात आले होते. पालिकेच्या अतिक्रमण पथकाने सर्व सामान जप्त केले असून सर्व गाळ्यांना सील ठोकण्यात आले असल्याची माहिती सोनवणे यांनी दिली.

राजकिय मंडळी आणि काही मुजोर अधिकाऱ्याच्या वशिलेबाजीमुळे पालिकेची घरे, गाळे घुसखोरांनी आपल्या ताब्यात घेतली आहेत. अशा घुसखोरांची झाडाझडती घेण्यास पालिकेच्या स्थावर मालमत्ता विभागाने सुरुवात केली आहे. या अनुषंगाने आज कळवा प्रभाग समिती क्षेत्रात अतिक्रमित गाळे मोकळे करून सील करण्याची कारवाई करण्यात आली. दरम्यान, ही शोधमोहिम सर्व प्रभाग समिती हद्दीत अशीच सुरू राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.