ठाणे: ठाणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय व राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय येथील ‘अधिष्ठाता’ पद व आरोग्य विभागातील वैद्यकीय आरोग्य अधिकारी’ ही दोन्ही पदे महापालिकेच्या राज्य शासनाने मंजूर केलेल्या नियमानुसार भरण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.
या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते व माजी वृक्ष प्राधिकरण सदस्य चंद्रहास तावडे यांनी महापालिकेकडे सातत्याने पत्रव्यवहार करुन पाठपुरावा केला होता. यासाठी त्यांनी न्यायालयात देखील धाव घेतली होती. अखेर त्यांच्या या लढ्याला यश आल्याचे दिसून आले आहे.
मागील कित्येक वर्षे ठाणे महापालिकेच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय व राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय येथील अधिष्ठाता पद व आरोग्य विभागातील वैद्यकीय आरोग्य अधिकारी ही दोनही पदे हंगामी प्रभारी तत्वावर नेमणुक करुन भरली जात होती. या संदर्भात तावडे यांनी वारंवार महापालिकेकडे तक्रारी केल्या होत्या. परंतु पालिकेने त्याकडे दुर्लक्ष केले होते. इतकेच काय ज्या डॉक्टरांवर फौजदारी गुन्हे दाखल होते अशा डॉक्टरांच्या प्रभारी अधिष्ठातापदी नेमणुका केल्या होत्या. तर मुंबई महापालिकेच्या वैद्यकीय अधिकारी चेतना नितीन के. यांची प्रभारी वैद्यकीय आरोग्य अधिकारी पदी नेमणूक केली होती. या दोन्ही पदांवरील नेमणुका या नियमबाह्य व बेकायदेशीर असल्याचे तावडे यांनी निदर्शनास आणूनही प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले होते. त्यामुळे त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात फेब्रुवारी २०२४ मध्ये रिट याचिका दाखल केली होती. या याचिकेत २०२० साली वैद्यकीय आरोग्य अधिकारी तसेच अधिष्ठाता पदासाठी वर्तमानपत्रात जाहीरात देऊनही ती प्रक्रिया पूर्ण न करताच तात्पुरत्या स्वरुपात नेमणुका करण्यात येत आहेत.
हे सर्व नियमबाह्य व बेकायदेशीर असून या दोन्ही महत्वाच्या पदांवर कायमस्वरुपी आणि नियमानुसार पात्र अधिका-यांचीच नेमणूक करण्यात यावी, अशी मागणी महापालिका आयुक्तांकडे लेखी निवेदनाद्वारे केल्याचे खंडपीठाच्या निदर्शनास आणण्यात आले. रिट याचिका न्या. ए. एस. गडकरी व न्या. कमल खाता यांचे खंडपीठाकडे सुनावणीकरीता आली असता खंडपीठाने याचिकेतील मुद्दे ग्राह्य धरुन सदर अधिष्ठाता व वैद्यकीय आरोग्य अधिकारीपदी राज्य शासनाने मंजूर केलेल्या नियमानूसार भरण्याची प्रक्रीया पूर्ण करण्याच्या मागणी पत्रावर चार आठवड्यात निर्णय घेण्याचे आदेश दिले असल्याची माहिती श्री.तावडे यांनी दिली.