अखेर विकासक आणि जागा मालकाविरुद्ध एमआरटीपी गुन्हा

दिव्यातील अनंतपार्क इमारतीवरील कारवाई प्रकरण

ठाणे : बांधकाम परवानगीबाबत कोणत्याही प्रकारची कागदपत्रे सादर करू न शकलेल्या आणि नागरिकांच्या रोषामुळे कारवाई करता न आलेल्या दिव्यातील अनंतपार्क या अनधिकृत इमारतीचा विकासक आणि जागा मालकाच्या विरोधात ठाणे महापालिकेच्या वतीने एमआरटीपीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विकासक आणि जागा मालकाच्या चुकांमुळे ११६ कुटुंबियांवर बेघर होण्याची वेळ आली आहे.

न्यायालयाच्या निर्देशानंतर दिव्यातील ५४ बेकायदा इमारतींवर कारवाई होणार असल्याचे निश्चित झाल्यानंतर या इमारतीमध्ये राहणाऱ्या रहिवाशांनी या कारवाईच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. गेल्या आठवड्यात प्रशासनाच्या कारवाई दरम्यान इमारतीवर प्रतिकात्मक फाशीचा दोर लावून प्रशासनाच्या कारवाईचा रहिवाशांकडून विरोध करण्यात आला. आम्हाला बेघर केले तर आत्मदहन करण्याशिवाय आम्हाला पर्याय नसल्याचा इशारा इमारतींमध्ये राहणाऱ्या महिलांनी दिला होता. तर लाडक्या बहिणींना बेघर करणाऱ्या सरकारचा आम्ही निषेध करत असल्याचेही या महिलांनी सांगितले. ठाणे महापालिका क्षेत्रातील दिवा भागातील ५४ बेकायदा इमारती पाडण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे इमारतींमधील रहिवाशांना पालिका प्रशासनाने नोटीस बजावण्यास सुरूवात केली आहे. या कारवाईसाठी पोलिस बंदोबस्त मिळावा यासाठी पालिका अधिकाऱ्यांनी पोलिस प्रशासनासोबत चर्चा सुरू केली आहे. त्याचबरोबर इमारतींचा वीज आणि पाणी पुरवठा खंडीत करण्याचेही नियोजन आखले आहे. दिव्यातील अनंत पार्क या इमारतीवरील कारवाईला नागरिकांनी प्रचंड विरोध दर्शवला असल्याने या ठिकाणी अद्याप पालिका प्रशासनाला कारवाई करता आलेली नाही.

मात्र आता दिवा प्रभाग समितीच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने जागा मालक मोहन मढवी आणि विकासक ज्ञानेश्वर मुंडे यांच्या विरोधात एमआरटीपीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ११ जानेवारी रोजी ठाणे महापालिकेच्या वतीने अनंत पार्क या इमारतीची पाहणी करण्यात आली. त्यानंतर विकासक ज्ञानेश्वर मुंडे यांच्याकडे महापालिकेच्या परवानगीची कागदपत्रे पालिकेकडून मागवण्यात आली. त्याच प्रकारची कागदपत्रे जागामालक मोहन मढवी यांच्याकडे देखील मागवण्यात आली. मात्र दोघांनाही अशाप्रकारची कागदपत्रे महापालिकेकडे सादर करता आली नसल्याने पालिकेने या दोघांच्या विरोधात अखेर एमआरटीपी अंतर्गत मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.