नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सज्ज

* परिचालन सुरू होण्याच्या दृष्टीने गाठला महत्त्वाचा टप्पा
* वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतला आढावा

नवी मुंबई: नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाचे संचालक फैज अहमद किडवई यांनी मंगळवार २५ फेब्रुवारी २०२५ रोजी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प स्थळाला भेट देऊन विमानतळाच्या सज्जतेचा आढावा घेतला.

यापूर्वी नवी मुंबई विमानतळ येथे ११ ऑक्टोबर २०२४ रोजी भारतीय हवाई दलातर्फे घेण्यात आलेली इन्स्ट्रूमेन्ट लॅंडिंग चाचणी आणि २९ डिसेंबर २०२४ रोजी इंडिगोतर्फे घेण्यात आलेली प्रवासी विमाना लॅंडिंग चाचणी यशस्वीरीत्या पार पडली होती.

या प्रसंगी विपिन कुमार, (भा. प्र. से.) अध्यक्ष, भारतीय विमानतळ प्राधिकरण, प्रकाश निकम, प्रादेशिक संचालक, नागरी विमान वाहतूक सुरक्षा मंडळ, विजय सिंघल, (भा. प्र. से.), उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको, शान्तनु गोयल, (भा. प्र. से.), सहव्यवस्थापकीय संचालक, सिडको, गीता पिल्लई, मुख्य महाव्यवस्थापक (परिवहन व विमानतळ), सिडको आणि नवी मुंबई इंटरनॅशनल (एनएमआयएएल) यांचे अधिकारी यांच्यासोबत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीपूर्वी २४ फेब्रुवारी २०२५ रोजी नागरी विमान वाहतूक महासंचलनालय आणि भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी संपूर्ण दिवस विमानतळाची पाहणी केली.

नागरी विमान वाहतूक महासंचालनालय ही देशातील प्रमुख विमानतळ सुरक्षा नियामक संस्था असून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिलेल्या भेटी दरम्यान महासंचालनालयातर्फे विमानतळाचे व्यापक मूल्यमापन करण्यात येऊन विमानतळाच्या सज्जतेचा आढावा घेण्यात आला.

नागरी विमान वाहतूक महासंचालनालयातर्फे विमानतळाच्या धावपट्टी, एप्रन, टॅक्सीवे, एटीसी टॉवर टर्मिनल बिल्डिंग, बॅगेज हॅंडलिंग सिस्टीम इ. महत्त्वाच्या क्षेत्रांची पाहणी करण्यात आली. या पाहणी दरम्यान मान्यवरांसाठी मॉक चेक-इन प्रक्रिया आयोजित करण्यात आली होती. यामध्ये डमी बोर्डिंग पास आणि बॅगेज टॅग जारी केले, ज्यावर रीव्ह्यू टीमने समाधान व्यक्त केले.

सिडकोतर्फे ११६० हेक्टरवर विकसित करण्यात आलेले नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रती वर्ष २० दशलक्ष प्रवासी आणि ०.८ दशलक्ष टन माल वाहतुकीकरिता नियोजित आहे. अंतिम टप्प्यात विमानतळाची प्रती वर्ष प्रवासी वाहतूक क्षमता ९० दशलक्ष आणि माल वाहतूक क्षमता २.६ दशलक्ष टन असणार आहे. मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील प्रवासी भार हलका करण्याच्या उद्देशाने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ विकसित करण्यात आले आहे. सदर विमानतळ मुंबई महानगर प्रदेशातील मध्यवर्ती ठिकाणी असून या विमानतळाद्वारे एमएमआर प्रदेशाच्या विकासाला चालना मिळणार आहे. सिडकोतर्फे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला उपनगरीय रेल्वे, मेट्रो, जलवाहतूक यांसह प्रस्तावित हैदराबाद हायस्पीड रेल्वेद्वारे कनेक्टिव्हिटी नियोजित आहे.