* महाशिवरात्रीनिमित्त अर्पण केलेल्या दुधावर पुनर्प्रक्रिया
* खोपट येथील मंदिराचा अनोखा उपक्रम
ठाणे : महाशिवरात्रीच्या पवित्र पर्वानिमित्त ठाण्यातील खोपट परिसरातील शंकर भोलेनाथ मंदिरात एका अनोख्या सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या दिवशी भक्तांनी अर्पण केलेल्या दुधाचा सदुपयोग करून त्यापासून मलाई मावा तयार करण्यात आला आणि तो गरजू तसेच अनाथ मुलांना प्रसाद म्हणून वाटप करण्यात आला.
हा उपक्रम आर निसर्ग फाउंडेशन आणि शंकर भोलेनाथ मंदिर ट्रस्ट, खोपट यांच्या संयुक्त विद्यमाने गेली नऊ वर्षे सातत्याने राबवला जात आहे. याचा मुख्य उद्देश अन्नाची नासाडी टाळून, गरजू व्यक्तींना पौष्टिक प्रसाद उपलब्ध करून देणे हा आहे. यंदाही सिग्नल शाळेतील आणि अनाथ आश्रमातील मुलांना हा स्वादिष्ट आणि पौष्टिक मलाई मावा प्रसाद स्वरूपात देण्यात आला. मंदिर समिती आणि स्थानिक भक्तगण यांच्या सहकार्याने हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला.
आर निसर्ग फाउंडेशनच्या सह-संस्थापिका लीना केळशीकर म्हणाल्या, “महाशिवरात्री म्हणजे केवळ उपासना नव्हे, तर परोपकाराची संधी देखील आहे. मंदिरात वाहिले जाणारे दूध वाया जाऊ नये म्हणून त्याचा सदुपयोग करण्यात आला आणि मुलांना पौष्टिक अन्न मिळाले, याचा आम्हाला आनंद आहे. भाविकांच्या श्रद्धेला धक्का न लावता अन्नाची नासाडी टाळण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. याशिवाय, कचरा व्यवस्थापनाच्या उद्देशाने आम्ही येथे अनोखा उपक्रम सुरू केला आहे. हे आमचे दहावे वर्ष असून, मागील नऊ वर्षांपासून आम्ही विविध उपक्रम राबवत आहोत. मंदिराच्या परिसरातील दुकानदार देखील प्लास्टिकचा वापर टाळून फुले, हार यांसारख्या वस्तू देण्यासाठी वर्तमानपत्राचा वापर करतात, त्यामुळे तेही आमच्या उपक्रमाला सहकार्य करतात.”
मंदिर समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले, “भाविकांकडून मंदिरात मोठ्या प्रमाणात दूध अर्पण केले जाते. हे दूध संकलित करून आर निसर्ग फाउंडेशनच्या माध्यमातून मावा तयार केला जातो आणि गरजूंसाठी त्याचे वाटप केले जाते. तसेच मंदिरात जमा होणाऱ्या निर्माल्याच्या व्यवस्थापनासाठी देखील आम्ही पुनर्प्रक्रिया प्रक्रियेत सहकार्य करत आहोत.”
या अनोख्या सामाजिक उपक्रमामुळे भक्तगण आणि स्थानिक सामाजिक संस्थांनी मंदिराच्या प्रयत्नांचे कौतुक केले आहे. भविष्यातही अशा उपक्रमांना प्रोत्साहन देण्याचा संकल्प मंदिर समितीने केला आहे.