अबू धाबी ओपनमध्ये भारतीय बॅडमिंटनचा झंझावात
अबूधाबी: भारतीय बॅडमिंटनच्या इतिहासात सोनेरी पान जोडले गेले! ठाणे बॅडमिंटन अकादमीच्या दीप रांभिया आणि प्रतीक रानडे यांनी अबू धाबी ओपन २०२५ मध्ये आपल्या अतुलनीय खेळाचे प्रदर्शन करत पुरुष दुहेरीचे विजेतेपद मिळवले. या विजयाने जागतिक बॅडमिंटनमध्ये भारताच्या वाढत्या ताकदीची दमदार साक्ष दिली आहे.
उपांत्यपूर्व फेरीत दीप रांभिया आणि प्रतीक रानडे यांनी कृष्ण देसाई आणि अमन नौशाद यांच्याविरुद्धच्या रोमांचक लढतीत २१-१४, २१-२३, २१-८ ने विजय मिळवला. उपांत्य फेरीत अबिय्यु फौझान माजिद आणि सोमी रोमधानी या इंडोनेशियन खेळाडू विरुद्धच्या चुरशीच्या सामन्यात २१-१४, ७-२१, २१-१३ ने बाजी मारली. तर अंतिम फेरीत कृष्ण प्रसाद गरगा आणि रवी सजयन या तगड्या जोडीला २३-२१, २१-१३ ने नमवून सुवर्णपदकावर आपले नाव कोरले.
या स्पर्धेत ठाणे बॅडमिंटन अकादमीच्या अनेक खेळाडूंनी सहभाग घेऊन उत्कृष्ट कामगिरी केली. अथर्व जोशी आणि पार्थिव नायर, आपले दोन सर्वोत्तम एकेरी खेळाडू, प्री-क्वार्टर फायनलमध्ये पराभूत झाले. क्रिश देसाई आणि अमन नौशाद यांची उभरती जोडी क्वार्टर फायनलमध्ये हरली. एकंदरीत, परदेशी खेळण्याचा ठाणे खेळाडूंसाठी हा एक उत्तम अनुभव होता, असे ठाणे ॲकॅडमीचे प्रमुख श्रीकांत वाड यांनी सांगितले.
दीप आणि प्रतीक यांनी आपल्या धडाकेबाज खेळाने आणि रणनीतिक चातुर्याने केवळ विजेतेपदच मिळवले नाही, तर ठाण्याच्या बॅडमिंटनला जागतिक स्तरावर नवी ओळख मिळवून दिली आहे. त्यांचे हे यश युवा खेळाडूंना प्रेरणा देणारे आहे.