सिमेंट मिक्सरमधून ६६ लाखांचा बनावट दारूसाठा जप्त

पुष्पा स्टाईलने दारूची तस्करी

ठाणे : ठाण्यात पुष्पा स्टाईलने करण्यात येणारी दारूची तस्करी उघडकीस आणली असून एका सिमेंट मिक्सरसह ६६ लाख ३९ हजाराचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. सदरची कारवाई ठाणे राज्य उत्पादन शुल्क विभागाचा भरारी पथकाने केली आहे.

ठाणे उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार परराज्यातील मद्याची वाहतूक होणार असल्याचे समजले. त्यानुसार सीबीडी-डी. वाय. पाटील युनिव्हर्सिटीकडे जाणाऱ्या रस्त्यावर घाटामध्ये दारूबंदी करण्यासाठी गस्त घालत असताना पांढऱ्या रंगाचा दहाचाकी सिमेंट मिक्सर या वाहनावर संशय आला. सदर वाहनास थांबवुन तपासणी केली असता वरती काहीच आढळून आले नाही. मात्र वाहनाच्या मधील बाजूस असलेल्या सिमेंट मिक्सरचे झाकण उघडून आतमध्ये तपासणी केली असता यामध्ये दारूचे बॉक्स आढळून आले. मिक्सरमध्ये लपवून ठेवलेले गोवा राज्यातील बनावट विदेशी मद्याचे ५९५ बॉक्स आढळून आले. ज्याची साधारण किंमत ६६ लाख ३९ हजार इतकी आहे. पथकाने दारूच्या बॉक्ससह सिमेंट मिक्सर ट्रक देखील जप्त केला आहे.

ठाणे उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने आज गस्त सुरू असतानाच नवी मुंबईमधील बेलापूर या ठिकाणी सापळा रचून सदर कारवाई केली आहे. या प्रकरणी मिक्सर चालक मोहन जोशी याला अटक करत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक एम. पी. धनशेट्टी, दुय्यम निरीक्षक एन. आर. महाले, दुय्यम निरीक्षक एस. आर. मिसाळ, सहाय्यक दुय्यम निरीक्षक बी.जी. थोरात आदींनी केली.