भिवंडी: भिवंडी न्यायालयात हजर झाल्यानंतर एका आरोपीने न्यायालयाच्या आवारात पोलिस व्हॅनमध्ये आपली पँट काढून नग्न होऊन गोंधळ घातला. एवढेच नाही तर त्याने व्हॅनमध्ये उपस्थित असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांना आणि महिला पोलिसांना शिवीगाळ करून पोलिसांना आव्हान देण्यास सुरुवात केली. या प्रकरणी शांतीनगर पोलिसांनी आरोपी आणि त्याची पत्नी, बहीण आणि आणखी एका आरोपीसह इतर चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्याणमधील आधारवाडी तुरुंगातून मोहम्मद अली अब्दुल अझीझ शेख (४५) यास भिवंडी न्यायालयात हजर राहण्यासाठी पोलिसांनी शुक्रवारी आणले. न्यायालयात हजर केल्यानंतर या आरोपीला पुन्हा तुरुंगात नेण्याची प्रक्रिया सुरू झाली. तेव्हा आरोपीने सांगितले की, त्याला न्यायालयाच्या तळमजल्यावर असलेल्या शौचालयात जायचे आहे. त्यावेळी पोलिसांनी त्यास शौचालयाचा दरवाजा उघड ठेवण्यास सांगितले. त्यावेळी शौचालयाचा दरवाजा उघडा न ठेवता आरोपीने कर्तव्यावर असलेल्या पोलिस पथकाशी त्याने गैरवर्तन करण्यास सुरुवात केली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला कोर्टाबाहेर नेले आणि व्हॅनमध्ये बसविण्याचा प्रयत्न केला. तेंव्हा कोर्टाच्या आवारात आरोपीने त्याची पत्नी आणि बहीण यांना तिथे पाहून जोरजोरात ओरडण्यास सुरुवात केली आणि पोलिस पथकाला अश्लील शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
आरोपी मोहम्मद अलीची पत्नी आणि बहीण यांनी आणखी एका व्यक्तीसोबत न्यायालयाच्या आवारात बेकायदेशीर गर्दी जमवली आणि पोलिसांसोबत धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली. यावेळी प्रसंगावधान राखून पोलिसांनी आरोपीला पकडले आणि त्यास व्हॅनमध्ये बसवले. या घटनेचा राग आल्याने आरोपीने पोलिस व्हॅनमध्ये आपली पँट काढली आणि नग्न होऊन महिला पोलिसांसह सर्व पोलिसांशी गैरवर्तन करण्यास सुरुवात केली. या प्रकरणी शांतीनगर पोलिस ठाण्यात आरोपी मोहम्मद अली अब्दुल अझीझ शेख, त्याची पत्नी, बहीण आणि आणखी एका व्यक्ती अशा चार जणांविरुद्ध शुक्रवारी रात्री ८ वाजता गुन्हा दाखल केला आहे. पुढील कारवाई पोलिस उपनिरीक्षक व्ही.एस.पंकर हे करीत आहेत.