मनसे नेते राजू पाटील यांची सडकून टीका
कल्याण: अनधिकृत बांधकाम करणाऱ्या गँग्स ऑफ डोंबिवलीचा म्होरक्या ठाण्यात राहत असल्याचा आरोप मनसेचे माजी आमदार तथा नेते राजू पाटील यांनी केली.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील 65 इमारती आणि दिवा येथील इमारती याबाबत रहिवाशांना न्यायालयीन लढा लढण्यासाठी मनसे सर्वोतोपरी मदत करणार असल्याचे सांगत राजू पाटील यांनी पत्रकार परिषद घेत मनसेची भूमिका मांडली.
यावेळी त्यांनी बोलतांना सांगितले की, अनधिकृत बांधकाम प्रकरणी गुन्हे दाखल असलेले जास्त महाभाग शिंदे गटात आहेत. सेलेब्रिटी सलमान खान यांना भेटण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्याकडे वेळ आहे, मात्र 65 इमारतींमधील नागरिकांना भेटायला वेळ नाही. गंगेत डुबकी मारण्यापेक्षा इथे येऊन रहिवाशांना भेटा पुण्य कमवा. अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांना, कागदपत्रे बनवणाऱ्यांना, लोकांची फसवणूक करणाऱ्यांना ठाण्यातून अभय मिळत असल्याचा आरोप श्री.पाटील यांनी केला.
रहिवाशांच्या पाठीशी मनसे उभी असून त्यांना कायदेशीर सल्ला देण्यासाठी लागणारी आर्थिक मदत करू मात्र यांना दिलासा कसा देणार, असा सवाल राजू पाटील यांनी केला. या प्रकरणी मंत्री गणेश नाईक यांना भेटणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्याकडून न्यायाची अपेक्षा असल्याचे पाटील यांनी सांगितले.