कारवाईदरम्यान स्थानिकांचा राडा
उल्हासनगर: उल्हासनगर २ येथील हनुमाननगर, दुर्गानगर आणि डंपिंग ग्राऊंड या भागात सरकारी भूखंडांवर अतिक्रमण करून अनधिकृत बांधकामे केली जात असल्याची माहिती मिळताच पालिकेने आयुक्त मनीषा आव्हाळे यांच्या आदेशानुसार तत्काळ कठोर कारवाई केली. या कारवाई दरम्यान स्थानिक नागरिकांनी राडा घातल्याने परिसरात तणाव निर्माण झाला होता.
उल्हासनगर महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या आदेशानंतर अतिरिक्त आयुक्त किशोर गवस यांनी संबंधित सहाय्यक आयुक्तांना तातडीने कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार, २४ फेब्रुवारी रोजी पोलिस बंदोबस्तात ही कारवाई पार पडली. या मोहिमेत १० खोल्यांच्या जोत्यांचे बांधकाम, पाच पक्क्या खोल्यांचे आणि दोन झोपड्यांचे बांधकाम संपूर्णपणे निष्कासित करण्यात आले. या कारवाई दरम्यान आक्रमक झालेल्या स्थानिक महिलांनी राडा घातला. एका महिलेने संतप्त होत स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र सहायक आयुक्त, प्रभाग समिती क्र. २ आणि नोडल अधिकारी गणेश शिंपी यांच्या मार्गदर्शनाखाली पालिकेच्या पथकाने ही मोहीम यशस्वीपणे पूर्ण केली.