दिव्यातील ५४ अनधिकृत इमारतींवरील कारवाई तूर्त स्थगित

* वनमंत्री गणेश नाईक यांचे अधिकाऱ्यांना निर्देश
* कल्याण-डोंबिवलीतील ६७ अनधिकृत इमारतींबाबतही तोडगा काढणार

ठाणे: दिव्यातील ५४ अनधिकृत इमारतींबाबत मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा करण्यात येईल, तोपर्यंत कोणत्याही प्रकारची कारवाई तूर्तास थांबवा, असे आदेश वन मंत्री गणेश नाईक यांनी दिले. यावेळी त्यांनी कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील ६७ अनधिकृत इमारतींबाबत देखिल राज्य सरकार सकारात्मक भूमिका घेईल, असे आश्वासन दिले.

ठाणे येथील खारकर आळी भागातील रघुवंशी हॉलमध्ये सोमवारी वनमंत्री गणेश नाईक यांनी जनता दरबार घेतला. यावेळी मोठ्या प्रमाणावर ठाणेकरांनी गर्दी केली होती. सुमारे ७०५ ठाणेकरांनी विविध समस्या प्रश्नांचे निवेदन दिले. अपंग आणि वयोवृद्ध नागरिकांनी देखिल प्रशासनाविरोधात निवेदन दिले होते.

दिवा येथिल अनधिकृत ५४ इमारतींच्या विरोधात कारवाई करण्यात येणार आहे. या इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या शिष्टमंडळाने निवेदन देताच तूर्तास अनधिकृत इमारतींच्या विरोधातील कारवाई थांबवा, उद्या होणाऱ्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून योग्य तो तोडगा काढण्यात येईल. तोपर्यंत कारवाई थांबवा, असे आदेश वनमंत्री श्री.नाईक यांनी दिले.

या जनता दरबारात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पदाधिकारी दिपेश म्हात्रे यांच्यासह नागरिकांनी नाईक यांना निवेदन देऊन कल्याण-डोंबिवली शहरातील बेकायदा इमारतीमधील रहिवाशांना न्याय देण्याची मागणी केली. त्यावर नाईक यांनी म्हात्रे आणि नागरिकांसोबत चर्चा करून त्यांच्याशी संवाद साधला. कल्याण-डोंबिवली शहरात अनेकांनी इमारतीत घरे घेतली. घर खरेदीसाठी बँकांनी कर्ज दिले. आता या इमारती बेकायदा असल्याचे निष्पन्न झाले असून येथील नागरिकांची फसवणूक झाली आहे. त्यात त्यांची काहीच चूक नाही. येथील नागरिकांनी त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी आणि कागदपत्रे जमा करण्यासाठी वेळ मागितला आहे. तसेच माजी मंत्री रविंद्र चव्हाण यांनीही मला फोन करून सांगितले की, त्यांच्या भागातही अशाच सात ते आठ इमारती आहेत. तसेच कल्याण ग्रामीणमध्येही अशा अनेक इमारती आहेत, असे नाईक म्हणाले. कल्याण-डोंबिवली शहरातील बेकायदा इमारतीमधील रहिवाशांची फसवणूक झाली असून याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत मंगळवारी होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करण्यात येईल. तसेच न्यायालयाच्या निर्णयाचा सन्मान ठेवून येथील नागरिकांना न्याय कसा देता येईल याचा विचार केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

कल्याणमधील ६५ इमारतींच्या बाबतीत आम्ही जनता दरबारात न्याय मागितला आहे, आम्हाला वनमंत्री गणेश नाईक यांनी आश्वस्त केले आहे की, येथील रहिवाशांवर कोणताही अन्याय होऊ देणार नाही. शासनाने आता न्यायालयात रहिवाशांसाठी रिट याचिका दाखल करावी आणि येथील जनतेला न्याय द्यावा, असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पदाधिकारी दिपेश म्हात्रे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

पुढील महिन्यात झालेल्या कारवाईचा आढावा घेण्यात येणार असल्याने तक्रारदार यांना पुढील महिन्यात झालेल्या कारवाईचा रिझल्ट मिळेल असे यावेळी श्री.नाईक यांनी सांगितले. ठाकरे शिवसेनेचे माजी आमदार सुभाष भोईर हे उंबरली येथिल अतिक्रमण आणि शिळफाटा येथिल दत्त मंदिर येथिल रस्ता रुंदीकरण झाले आहे परंतु त्याचा मोबदला मिळाला नसल्याचे निवेदन यावेळी दिले.

या जनता दरबारमध्ये आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, शहर भाजपा अध्यक्ष संजय वाघुले माजी नगरसेवक नारायण पवार, भरत चव्हाण, मनोहर डुंबरे आदी उपस्थित होते.