अंबरनाथ नगरपालिकेत कचरा फेकण्याचा मनसेने दिला इशारा

अंबरनाथ : गेल्या चार ते पाच दिवसांपासून अंबरनाथध्ये निर्माण झालेल्या कचरा कोंडीतून ठोस उपाययोजना न झाल्यास शहरातील जमा झालेला कचरा नगरपालिकेत आणून टाकण्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने नगरपालिका प्रशासनाला देण्यात आला आहे.

गेल्या चार ते पाच दिवसांपासून कचरा उचलून नेणारे कंत्राटी कामगारांचे वेतन थकल्याने त्या कामगारांनी काम बंद आंदोलन केले आहे, त्यामुळे शहरात कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे. असे प्रकार शहरात वारंवार घडत आहेत, त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी नगरसेवक ॲड. स्वप्नील बागुल यांनी येत्या तीन दिवसांत कचरा कोंडीतून नागरिकांची सुटका न झाल्यास पालिका आवारात कचरा फेकण्याचा इशारा दिला आहे.

गेल्या पाच वर्षांपासून प्रशासकीय राजवटीत नागरिकांना मूलभूत सुविधा मिळत नसून समस्या सोडवण्यात पालिका प्रशासनाला अपयश आल्याचा आरोप ॲड. बागुल यांनी केला. कचरा उचलणाऱ्या कंत्राटी कामगारांना वेळेवर वेतन मिळत नसेल तर कोट्यवधी रुपयांची विकास कामे करून उपयोग काय असा सवाल त्यांनी पालिका प्रशासनाला विचारला. येत्या तीन दिवसांत कचरा प्रश्न मिटला नाही तर नगरपालिकेत कचरा फेको आंदोलन करू, असा इशारा ॲड. बागुल यांनी दिला.