जगातील एकमेव फलंदाज ठरला
दुबई: क्रिकेटचा किंग, म्हणजेच विराट कोहलीने आणखी एक ऐतिहासिक विक्रम आपल्या नावावर केला आहे. विराटने आज चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मोठा विक्रम मोडला आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 14 हजार धावा करणारा कोहली जगातील पहिला खेळाडू बनला आहे.
कोहलीने 299व्या एकदिवसीय सामन्याच्या 287व्या डावात ही चमकदार कामगिरी केली. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यात कोहलीने बांगलादेशविरुद्ध फक्त 22 धावा केल्या होत्या. त्यामुळे या ऐतिहासिक विक्रमापासून तो अवघ्या 15 धावा दूर होता. मात्र आज दुबईत पाकिस्तानविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात त्याने हा विक्रम केला आहे. कोहलीने 13व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर चौकार मारून हा विक्रम केला आहे.
यापूर्वी हा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर होता. सचिनने आपल्या 350 व्या डावात हा विक्रम केला होता. सचिननंतर श्रीलंकेचा कुमार संगकाराने 378 डावात 14 हजार वनडे धावा केल्या होत्या. आता कोहलीने सर्वात जलद 14 हजार धावांचा विक्रम केला आहे.
भारताचा फलंदाज रोहित शर्मानेही पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात खाते उघडताच एकदिवसीय क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून 9000 धावा पूर्ण केल्या. त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये केवळ 181 डावात 9000 धावांचा टप्पा ओलांडला. याआधी हा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर होता. सचिनने 9000 धावांचा टप्पा गाठण्यासाठी 197 डाव खेळले होते. आता रोहित शर्माने हा विक्रम मोडून आपल्या नावावर केला आहे.
या दिग्गजांनाही मागे सोडले
सचिनशिवाय रोहित शर्माने सौरव गांगुली, ख्रिस गेल, ॲडम गिलख्रिस्ट आणि सनथ जयसूर्यासारख्या दिग्गज सलामीवीरांनाही मागे टाकले आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून 9000 धावा पूर्ण करण्यासाठी सौरव गांगुलीने 231 डाव, ख्रिस गेलने 246 डाव, ॲडम गिलख्रिस्टने 253 डाव आणि सनथ जयसूर्याने 268 डाव घेतले होते. दरम्यान, पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्माला मोठी खेळी करता आली नाही. त्याने 15 चेंडूंत 133.33 च्या स्ट्राइक रेटने 20 धावा केल्या. यादरम्यान त्याने 3 चौकार आणि एक षटकार मारला.