सुरेश धसांची मोठी घोषणा
बीड: मस्साजोगमधील ग्रामस्थांनी गुंड आणि पोलिसांमध्ये असलेल्या मिलीभगत याबद्दल प्रश्न उपस्थित केले. यानंतर आता सुरेश धस यांनी मोठी घोषणा केली आहे.
मुख्यमंत्र्यांनी पोलीस अधीक्षकांची बदली केली, हे मान्य आहे. पण, खालच्या पोलीस अधिकाऱ्यांचे काय? असा प्रश्न धनंजय देशमुख यांनी सुरेश धसांना केला. पोलीस उपअधीक्षकांसह पोलीस प्रशासनातील सगळे अधिकारी यांचे मित्र आहेत, असे धनंजय देशमुख म्हणाले. तर सगळ्यांच्या बदल्या कराव्या लागतील अशी मागणी मस्साजोगच्या ग्रामस्थांनी केली. यांची बदली करून होणार नाही, यांना शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. या भेटीनंतर सुरेश धस यांनी मोठी भूमिका घेतली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संतोष देशमुख हत्या प्रकरणात न्याय मिळत नाही, तोपर्यंत स्वागत सत्कार स्वीकारणार नाही, अशी भूमिका सुरेश धस यांनी घेतली आहे. एका कार्यक्रमामध्ये त्यांनी सत्कार नाकारल्याचे म्हटले जात आहे. मंत्री जयकुमार गोरे यांची धाराशीवचे जिल्हा संपर्क प्रमुख म्हणून नियुक्ती आणि भाजपा नेते सुजितसिंह ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भाजपा आमदार सुरेश धस या कार्यक्रमाला उपस्थित होते. परंतु, सुरेश धस यांनी सत्कार नाकारला. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी न्याय मिळत नाही, तोपर्यंत आपण सत्कार स्वीकारणार नाही, असे सुरेश धस यांनी म्हटले आहे.
दरम्यान, भाजपा आमदार सुरेश धस यांनी मस्साजोग येथे संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर ते परळी येथे महादेव मुंडे यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. या भेटीनंतर एका कार्यकर्त्याच्या घरी जात असताना सुरेश धस यांना धनंजय मुंडे यांच्या समर्थकांकडून विरोध करण्यात आला. काळे झेंडे दाखवून सुरेश धस यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.