प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत ७३ लोकांना घरांसाठी मंजूरी पत्रे

उल्हासनगर : प्रधानमंत्री आवास योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात ग्रामीण भागातील गरजूंना घरे उपलब्ध करून देण्यासाठी आमदार कुमार आयलानी यांच्या हस्ते शनिवारी शहरातील ग्रामीण भागात येणाऱ्या म्हारळ, वरप, कळंबा या गावांतील लाभार्थ्यांना मंजुरी पत्र सुपूर्द करण्यात आले. योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात उल्हासनगरच्या ग्रामीण भागातील एकूण 73 घरांच्या मालकांना शनिवारी मंजुरी पत्रे देण्यात आली.

शनिवारी म्हारळ, वरप व कळंबा गावात घरकुल योजनेंतर्गत आयोजित कार्यक्रमात आमदार कुमार आयलानी यांनी प्रथम कळंबा गावात पोहोचून तेथील 50 जणांना, वरपमधील सहा आणि म्हारळ गावातील 17 जणांना मंजुरीचे पत्र दिले. यावेळी सर्व गावचे सरपंच व इतर ग्रामस्थ उपस्थित होते. मंजुरीपत्र वाटप कार्यक्रमादरम्यान आमदार कुमार आयलानी म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस हे समाजातील सर्वात खालच्या घटकातील लोक कोणत्याही प्रकारे वंचित राहू नयेत आणि त्यांचे जीवनमान उंचावेल यासाठी सातत्याने प्रयत्न करत असून या अंतर्गत लाभार्थी बांधवांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद हेच आज भाजपचे यश आहे.

उल्हासनगर विधानसभेच्या ग्रामीण भागात एकूण 73 लाभार्थ्यांना मंजुरी पत्र देण्यात आले असून, लवकरच सर्व लाभार्थ्यांना कायमस्वरूपी घरे मिळतील व उर्वरित लोकांनाही लवकरच मंजुरीपत्रे मिळतील, असा विश्वास आमदार कुमार आयलानी यांनी व्यक्त केला. कांबा गावचे सरपंच हरिदास सावर, उपसरपंच दत्ता भोईर, माजी सरपंच छाया बनकरी, वरप येथील हनुमंत भोईर, म्हारळ येथील सरपंच योगेश देशमुख, दीपक आयरे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.