गिलच्या शतकासह बांगलादेशवर मिळवला शानदार विजय
दुबई: शुबमन गिलचं शतक, केएल राहुलचा विजयी षटकार आणि मोहम्मद शमीचे ५ विकेट्स… यासह भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मधील पहिल्याच सामन्यात बांगलादेशवर ६ विकेट्सने शानदार विजय मिळवला.
बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना २२८ धावा केल्या. तर भारताने लक्ष्याचा पाठलाग करताना ६ विकेट्सने आणि २१ चेंडू शिल्लक ठेवत जबरदस्त विजयाची नोंद केली. शुबमन गिल, मोहम्मद शमी हे भारताच्या विजयाचे हिरो ठरले.
शुबमन गिल पहिल्यांदाच आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा खेळत आहे आणि या स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात त्याने शतक झळकावत आपल्या कामगिरीची छाप पाडली आहे. सलामीसाठी उतरलेला गिल भारताला विजय मिळवून देतच माघारी परतला. गिलने १२९ चेंडूत ९ चौकार आणि २ षटकारांसह नाबाद १०१ धावा केल्या. उपकर्णधार असलेल्या शुबमन गिलने भारताच्या डावाची जबाबदारी घेत विजय मिळवून दिला.