ठामपा अधिकाऱ्यांची घेतली झाडाझडती
ठाणे: ठाणे महापालिका क्षेत्रातील धोकादायक, अतिधोकादायक, अनधिकृत इमारती आणि झोपडपट्ट्यांच्या पुनर्विकासासाठी क्लस्टर योजना क्रांतीकारक आहे. मात्र, आतबट्टयाचे व्यवहार करून प्रशासनाने क्लस्टर योजना विकासकांना आंदण देऊ नये, असे परखड बोल आमदार संजय केळकर यांनी सुनावले आहेत.
गुरुवारी आ. केळकर यांनी नागरीकांसमवेत ठाणे महापालिकेच्या संबधित अधिकाऱ्यांची भेट घेऊन याबाबत विस्तृत चर्चा केली. त्यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच खडसावले.
भाजप-शिवसेना युती सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी ठाणे शहरात क्लस्टर योजना राबवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पालिका क्षेत्रात विविध भागात ४८ नागरी पुनर्निर्माण आराखडे तयार करण्यात आले आहेत. क्लस्टरसारख्या महत्वाकांक्षी योजनेला मूर्त स्वरूप मिळत असताना शहरातील मानपाडा, अशोक नगर, आझादनगर, गणेश नगर तसेच मनोरमा नगर भागात कार्यालय थाटुन दंडेलशाही करणाऱ्या विकासकांच्या विरोधात नागरीकांमध्ये क्लस्टरबाबत संभ्रमाचे वातावरण आहे. यापूर्वी अधिवेशनात आ. केळकर यांनी अशा हजारो झोपडीधारकांची बाजू ठामपणे मांडली असल्याने या भागातील नागरीकांनी क्लस्टर संदर्भातील तक्रारींचा पाढा आ. संजय केळकर यांच्याकडे वाचला. त्यानंतर, गुरुवारी (दि.२० फेब्रु.) आ. केळकर यांनी नागरीकांसह थेट ठाणे महापालिका मुख्यालयात संबधित अधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी, नागरीकांनीही अधिकाऱ्यांकडे क्लस्टर संदर्भातील शंका मांडल्या. यावर अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे आणि अन्य अधिकाऱ्यांनी वस्तुस्थिती मांडल्यानंतर क्लस्टरसाठी झोपड्यांचे सर्वेक्षण म्हणजे अंतिम मंजुरी नसल्याचा विश्वास रहिवाशांना दिला. क्लस्टरविषयी शंका असेल तर प्रशासनाने जाहिर सभा अथवा बैठका घेऊन रहिवाशांच्या शंकांचे निरसन करावे. त्याचबरोबर वैयक्तिक पातळीवरही तक्रारदारांच्या तक्रारी ऐकुन घ्याव्यात. असे सक्त निर्देश देत क्लस्टर योजना विकासकाला आंदण देऊ नका, असे प्रशासनाला बजावले.