रेल्वे वाहतूक विस्कळीत
कल्याण: मध्य रेल्वेच्या टिटवाळा-खडवली दरम्यान गुरुवारी सकाळी ८:३० ते ९ वाजण्याच्या सुमारास मालगाडीचे कपलिंग तुटल्याने डाऊन दिशेने जाणारी संपूर्ण रेल्वे वाहतूक ठप्प झाली. या बिघाडामुळे मुंबईहून कसारा आणि पुढील मार्गावर जाणाऱ्या सर्व लोकल आणि एक्सप्रेस गाड्या तासभर उशिराने धावत होत्या. परिणामी, प्रवाशांचे हाल झाले तर चाकरमान्यांचे वेळापत्रक कोलमडले.
या खोळंब्याचा सर्वाधिक फटका नियमित लोकल प्रवाशांना बसला. अप आणि डाऊन मार्गावरील गाड्या विलंबाने धावत असल्याने मुंबईच्या दिशेने येणाऱ्या लोकलही वेळापत्रकाबाहेर धावत होत्या. अनेक चाकरमानी कार्यालयात पोहोचण्यास उशीर झाल्याने अस्वस्थ झाले. या गोंधळाचा परिणाम केवळ नोकरी करणाऱ्या प्रवाशांवरच नाही, तर परीक्षेसाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांवरही झाला.
इयत्ता १२ वीच्या बोर्ड परीक्षेसाठी अनेक विद्यार्थी सकाळच्या सत्रासाठी रेल्वेने परीक्षा केंद्रांकडे जात होते. मात्र, गाड्या वेळेत न आल्याने विद्यार्थ्यांना तणावाचा सामना करावा लागला. अनेक विद्यार्थी किमान अर्धा ते एक तास उशिराने परीक्षागृहात पोहोचले, ज्यामुळे त्यांचा वेळ वाया गेला.
कल्याण-कसारा रेल्वे पॅसेंजर वेल्फेअर असोसिएशनचे सचिव उमेश विशे यांनी परिस्थितीची गंभीर दखल घेत, प्रवाशांच्या सोयीसाठी मेल आणि एक्सप्रेस गाड्यांना तात्पुरता थांबा देण्याची मागणी केली. या मागणीनंतर “गरीब रथ मेल” ला थांबा देण्यात आला, तसेच प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी १०:०३ वाजता मुंबईकडे जाणारी स्लो लोकल जलद करण्यात आली.
या प्रकारामुळे मध्य रेल्वे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वारंवार होणाऱ्या तांत्रिक बिघाडांमुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने वेळीच उपाययोजना करावी, अशी मागणी प्रवासी संघटनांकडून केली जात आहे.