पाण्याची टाकी होईना, पाणी काही मिळेना
शहापूर: शहापूर नगरपंचायतीच्या प्रभाग क्रमांक ७ मध्ये नऊ लाख लिटर क्षमतेची पाण्याची टाकी मंजुर होऊन तत्कालीन खासदार तथा पंचायत राज केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते उदघाटन होऊन एक वर्ष उलटत आले तरी ठेकेदार कंपनीकडून बांधकामाला सुरुवात होत नसल्याने शहापूर नगरपंचायत हद्दीतील जवळपास १२ हजारपेक्षा जास्त नागरिकांना पिण्याच्या पाण्यापासून वंचित रहावे लागत आहे.
शहापूर नगरपंचायतीच्या ९ मार्च २०२३ च्या सर्वसाधारण सभेतील ठराव क्रमांक ३३ व २७ फेब्रुवारी २०२३ च्या स्थायी समिती ठराव क्रमांक ९२ नुसार मंजूर निविदान्वये शहापूर नगरपंचायत हद्दीतील प्रभाग क्रमांक ७ मधील नऊ लाख लिटर क्षमतेची उंच टाकी बांधण्याचे कार्यारंभ आदेश असून या पाण्याच्या टाकीचा अंदाजित खर्च एक कोटी ४७ लाख ४८,८१७ इतका आहे. निविदेतील अटी-शर्ती व मंजूर ठराव तसेच ठेकेदार कंपनीने करून दिलेला करारनामा यांचे अधिन राहून सदरचे काम तत्काळ सुरु करून २७० दिवस मुदतीत पूर्ण करून देण्याचे कार्यादेश उल्हासनगर येथील नितेश मोहन मलवानी यांना देण्यात आले आहेत. मात्र वर्ष उलटूनही सदर टाकीचे बांधकाम होत नसल्याने शहापूरकरांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. दरम्यान दिलेल्या २७० दिवसांच्या मुदतीत काम पूर्ण न केल्यास करारनाम्यातील तरतुदीप्रमाणे ठेकेदार कंपनीला दिवसा १०० रुपये प्रमाणे दंडात्मक कार्यवाहीला सामोरे जावे लागणार आहे. हे काम शासनाच्या विविध कायदे, नियम, अधिनियम, शासन निर्णय, परिपत्रके तसेच शासकीय ध्येय धोरणानुसार करणे बंधनकारक असतांना सदर काम वर्षभरात पूर्ण होऊ शकले नसल्याने प्रशासकीय यंत्रणेच्या कामकाजवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे. शहापूर याच प्रभाग क्रमांक ७ मधील नवीन पाणीपुरवठा योजनेवर तीन एमएलडी कॉम्पॅक्ट जल शुद्धीकरण केंद्र उभारण्याचे काम बदलापूर येथील माना इलेक्ट्रिक आणि इंजिनिअरिंग सर्व्हिसेस यांना देण्यात आले आहे.
सन २०११ च्या जनगणनेनुसार शहापूर नगरपंचायत हद्धीतील लोकसंख्या ११,६२३ इतकी होती. दरम्यान १३ वर्षांनंतर हीच लोकसंख्या २५ हजारांवर गेली आहे. पूर्वी शहापूरात कमी लोकसंख्या असल्याने गोठेघर, चेरपोली व कळंभे या ग्रामपंचायतींच्या हद्धीतील काही नळ धारकांना या पाणी योजनेतून पाणीपुरवठा केला जात असल्याचे नगरपंचायत कार्यालयातून सांगण्यात आले. दरम्यान ठेकेदार कंपनीच्या उदासीनतेमुळे शहापूर नगरपंचायत हद्धीतील सुमारे २५ हजाराच्या वरील नागरिक शुद्ध पिण्याच्या पाण्याच्या प्रतिक्षेत आहेत.
दरम्यान मुख्याधिकारी शिवराज गायकवाड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. या संदर्भात मुख्याधिकारी शिवराज गायकवाड हेच संबंधित ठेकेदाराला पाठीशी घालत असल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे.
ठेकेदाराला कार्यारंभ आदेश दिला असून वेळेत काम सुरू न केल्यामुळे दोन नोटीस देखील दिल्या आहेत. आमच्यासाठी काम सुरु होणे महत्वाचे आहे, असे पाणीपुरवठा विभागाचे अभियंता रुपेश कोंडे यांनी सांगितले.