अंबरनाथ: मालकी असलेल्या जागेवर समाजकंटकांकडून अतिक्रमण करून त्या ठिकाणी चाळींचे बांधकाम केल्यामुळे सुनील वाघे या आदिवासी बांधवाने कुटुंबासहित न्याय मिळवण्यासाठी अंबरनाथ तहसील कार्यालयाबाहेर उपोषणाचा मार्ग पत्करला आहे.
यावेळी मागण्यांचे निवेदन देखील त्यांनी तहसीलदारांना दिले. नायब तहसिलदारांच्या चौकशीनंतर कार्यवाही करण्याच्या आश्वासनंतर सायंकाळी उपोषण मागे घेण्यात आले.
शहराच्या पश्चिमेला असलेल्या मोरीवली येथील गट नं. ४७ मध्ये अंदाजे २२ गुंठे जागा सुनील वाघे व त्यांच्या कुटुंबियांच्या नावे आहे. त्याचा सात-बारा देखील त्यांच्या नावे असल्याचे सुनील वाघे यांनी सांगितले. मात्र आपल्या अज्ञानाचा व अशिक्षितपणाचा फायदा घेऊन काही समाजकंटकांनी संबंधित जागेवर अतिक्रमण केले असल्याने भूमिहीन झाले असून जागेवरील अतिक्रमण हटवण्यासाठी तहसीलदार कार्यालयाबाहेर उपोषण सुरू केले आहे. ठोस कारवाईचे आश्वासन मिळत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार असल्याचे सुनील वाघे यांनी सांगितले.
नायब तहसीलदार किरण पाटील यांनी उपोषणकर्ते सुनील वाघ यांना चौकशीचे लेखी पत्र दिल्यानंतर यांनी उपोषण तूर्त मागे घेतल्याचे वाघे यांनी सांगितले. या प्रकरणी सविस्तर चौकशी करून नियमानुसार काय कारवाई करता येईल, याबाबत संबंधितांना सुचना दिल्या आहेत, असे नायब तहसीलदार किरण पाटील यांनी सांगितले.