* उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विश्वास
* वृक्षवल्ली प्रदर्शनाला दमदार सुरुवात
ठाणे: ठाणे महापालिकेने एक एकरच्या क्षेत्रात सेंद्रीय भाजीपाला पिकवावा. नागरिक तेथे भेट देतील, खरेदी करतील. अशाप्रकारचा प्रयोग करणारी ठाणे महापालिका ही पहिलीच महापालिका ठरेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला.
ठाणे महापालिकेतर्फे कॅडबरी जंक्शननजिक रेमंड कंपनीच्या मैदानात आयोजित करण्यात आलेल्या १४व्या झाडे, फुले, फळे, भाजीपाला यांचा समावेश असलेल्या वृक्षवल्ली-२०२५चे उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.
ठाणे शहर हे स्वच्छ आणि सुंदर शहर करण्यासाठी आपण काम करतोच आहोत, आता हे हरित शहर म्हणूनही प्रसिद्ध व्हायला हवे. त्यात सगळ्यांनीच सहभाग घ्यावा. विशेषत: ठाण्यातील सर्व विद्यार्थ्यांनी किमान एक झाड लावावे आणि त्याची काळजी घ्यावी. महापालिकेने त्याप्रमाणे उपक्रम आखावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
प्रदर्शनाचे उद्घाटन केल्यावर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी प्रदर्शनातील सजावट, झाडे, फुले यांची पाहणी केली. खास वातानुकुलित कक्षातील विशेष रोपे, फुले यालाही त्यांनी भेट दिली. भातशेती, गावातील घराची प्रतिकृती, भाजीपाला विभाग, औषधी वनस्पती विभाग, विद्यार्थ्यांनी काढलेली चित्रे, विविध प्रकारचे स्टॉल यांचीही पाहणी त्यांनी केली.
निसर्गाचे संवर्धन करायचे असेल तर आपण मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड केली पाहिजे. ठाणे महापालिकेने गेल्या वर्षी मुख्यमंत्री हरित अभियानात दीड लाख झाडे लावली. यावर्षी ती संख्या दोन लाखावर न्यावी. पुढील वर्षी आणखी वाढवावी, असेही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले. बांबू लागवड, ऑक्सिजन पार्कचा विकास, तलावांचे सुशोभिकरण यावरही महापालिका लक्ष देत आहे. जोगिला तलाव पूर्ववत करण्याचे काम ७० टक्के झाले आहे. उर्वरित काम लवकर पूर्ण करून पूर्ण भरावाखाली गेलेला तलाव पूर्ववत करण्याचे मोठे काम होणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
यंदाचे प्रदर्शन हे ‘जैवविविधतेचे सप्तरंग’ या संकल्पनेवर आधारित असून या प्रदर्शनात सुमारे २०० प्रजातींची फुलझाडे, फळांची रोपटी, रंगीबेरंगी फुले व पाने असलेली झाडे, औषधी वनस्पती आदी मिळून सुमारे पाच हजार रोपांचा समावेश आहे. सुमारे ९० संस्थांनी आकर्षक पुष्परचना, निसर्गाशी निगडीत देखावे, फुलपाखरांची छायाचित्रे यामधून नागरिकांच्या मनोरंजनासह ज्ञानात भर पाडणाऱ्या देखाव्यांची मेजवानी सादर केली आहे. प्रदर्शनामध्ये कुंड्यांमधील शोभिवंत पानांची झाडे (झुडुपे), कुंड्यातील शोभिवंत फुलझाडे, वामन वृक्ष, आमरी (ऑर्कीडस्) कुंडीतील वृक्ष, हंगामी फुले, दांडीसह (कट फ्लॉवर) इतर असे एकूण ३० विभाग व पोटविभाग आहेत. तसेच, यावर्षी लाईव्ह नेचर पेंटींग, तज्ज्ञांच्या सहाय्याने वृक्षावर यंत्राच्या मदतीने रोहण करण्याचे प्रात्यक्षिक, हेरिटेज ट्री ट्रेल ही प्रमुख आकर्षणे नागरिकांना अनुभवता येणार आहेत.
उद्घाटनप्रसंगी व्यासपीठावर, महापालिका आयुक्त सौरभ राव, माजी महापौर मिनाक्षी शिंदे, माजी नगरसेविका नम्रता भोसले, अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे, उपायुक्त (उद्यान) मधुकर बोडके, वरिष्ठ उद्यान अधिक्षक केदार पाटील आदी उपस्थित होते.