मेट्रो कारशेड, पार्क आणि पार्किंगची आरक्षणे रद्द करा

* विकास आराखड्याच्या सुनावणीत बाधितांची मागणी
* सात हजारांपैकी केवळ १०० हरकतींवर झाली सुनावणी

ठाणे: ठाणे महापालिकेचा नव्याने तयार करण्यात आलेल्या विकास आराखड्यावर गुरुवारपासून सुनावणीला सुरुवात झाली असून पहिल्याच दिवशी मेट्रो कारशेड, पार्क आणि पार्किंगसाठी टाकण्यात आलेली आरक्षणे रद्द करण्याचा नागरिकांचा सूर दिसून आला. नवीन विकास आराखड्याच्या संदर्भात हजार हरकती प्राप्त झाल्या असून पहिल्या दिवशी केवळ १०० हरकतींवर सुनावणी घेऊन तक्रारदारांचे म्हणणे एकूण घेण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने मेट्रो कारशेडमध्ये बाधित होत असलेल्या नागरिकांचा समावेष होता.

ठाणे शहराचा तब्बल २० वर्षानंतर सुधारित आराखडा तयार करण्यात आला आहे. शहराची लोकसंख्या वाढत असताना वाहतुक कोंडी, शैक्षणिक दर्जा, डिजीटल विद्यापीठ, वैद्यकीय शिक्षण,आरोग्य सुविधा यासह सुविधा केंद्र उपलब्ध करून देण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. तसेच या विकास आराखड्यामुळे अनेक इमारती, बैठ्या चाळी, धार्मिक स्थळे, शाळा उद्ध्वस्त होणार असल्याचा आरोप करत आरक्षणाला अनेक ठिकाणी विरोध झाला आहे. पालिकेने या सुधारित विकास आराखड्यासंदर्भात सूचना हरकती मागवल्या होत्या. दरम्यान, ३ फेब्रुवारी रोजी सुनावणी ठेवण्यात आली होती. मात्र काही कारणास्तव ती पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर गुरुवारपासून या सर्व हरकतींवर सुनावणी घेण्यास सुरुवात झाली आहे. घोडबंदर, कळवा भागातील नागरीकांनी रस्ता रुंदीकरणाला विरोध केला आहे. तर नौपाड्यातील नागरीकांना रस्ता रुंदीकरण हवे असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. तब्बल सात हजार ५०० हून अधिक हरकती सूचना प्राप्त झाल्याची माहिती पालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.

सात हजारांपैकी १०० हरकतींवर सुनावणी घेण्यात आली असून यामध्ये प्रामुख्याने विविध ठिकाणी टाकण्यात आलेल्या आरक्षणाला नागरिकांनी आक्षेप घेतला आहे. मोगरपाडा या ठिकाणी मेट्रो कारशेडचे आरक्षण टाकण्यात आले आहे. मोबदला संदर्भात अद्याप कोणत्याही प्रकारचा निर्णय न झाल्याने या आरक्षणाला नागरिकांनी विरोध केला आहे. घोडबंदर भागात होत असलेल्या पार्कच्या आरक्षणाला देखील विरोध करण्यात आला असून विविध ठिकाणी पार्किंगसाठी टाकण्यात आलेल्या आरक्षणावर देखील नागरिकांनी हरकती घेतल्या आहेत. विशेष म्हणजे रस्ता रुंदीकरणात बाधित होत असलेल्या नागरिकांनी रस्ता रुंदीकरण करत असताना त्याबदल्यात टीडीआरची मागणी पालिका प्रशासनाकडे केली आहे. आलेल्या १०० हरकतींवर सुनावणी घेऊन सर्वांचे म्हणणे ऐकून घेण्यात आले असल्याची पालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.

२००० हरकती एकसारख्याच
ठाणे महापालिकेकडे प्राप्त झालेल्या हरकतींपैकी जवळपास २००० हरकती या एकसारख्याच असून मायना एकच केवळ नाव वेगळे असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. त्यामुळे १०० हरकतींवर सुनावणी घेण्यात आली असली तरी, या २००० हजार हरकती यामध्ये कमी होण्याची शक्यता आहे. रोज १०० ते १५० या प्रमाणे दीड महिना या सर्व हरकतींवर सुनावणी घेण्यात येणार असल्याचे पालिका प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.