ठामपाकडून वृक्षवल्ली-२०२५ भव्य प्रदर्शनाचे आयोजन
ठाणे : झाडे, फुले, फळे आणि रोपे यांचे वृक्षवल्ली-२०२५ हे भव्य प्रदर्शन ठाणे महानगरपालिकेचा उद्यान विभाग आणि वृक्षप्राधिकरण यांच्यातर्फे आयोजित करण्यात आले आहे. शुक्रवार, १४ फेब्रुवारी ते रविवार, १६ फेब्रुवारी या काळात रेमंड कंपनीचे मैदान, पोखरण रोड येथे हे प्रदर्शन होत आहे. शुक्रवारी, १४ फेब्रुवारी रोजी दुपारी ३.०० वा. या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे.
‘वृक्षवल्ली’ प्रदर्शनाचे यंदाचे १४ वे वर्ष आहे. दरवर्षी या प्रदर्शनाला सुमारे दीड ते दोन लाख नागरिक भेट देतात. यंदाचे प्रदर्शन हे ‘जैवविविधतेचे सप्तरंग’ या संकल्पनेवर आधारित असून या प्रदर्शनात सुमारे २०० प्रजातींची फुलझाडे, फळांची रोपटी, रंगीबेरंगी फुले व पाने असलेली झाडे, औषधी वनस्पती आदी मिळून सुमारे पाच हजार रोपांचा समावेश आहे.
या प्रदर्शनामध्ये रोटरी क्लब, इनरव्हिल क्लब, पर्यावरण दक्षता मंच, महाराष्ट्र निसर्ग उद्यान, माहिम यांच्यासह एमसीएचआय, हिरानंदानी समूह, अदानी समूह, लोढा समूह, रेमंड समूह अशा १५ खाजगी संस्था सहभागी झाल्या आहेत. तसेच स्थानिक ३० शाळांतील विद्यार्थ्यांनी चित्रकला व निसर्गाशी निगडीत देखावे साकारले आहेत. कट फ्लावर्स, पुष्परचनामध्ये ३० नागरिकांनी सहभाग घेतला आहे. यांच्यासह मध्य रेल्वे, एचपीसीएल या सरकारी संस्था ही प्रदर्शनात सहभागी झाल्या आहेत. एकूण सुमारे ९० संस्थांनी आकर्षक पुष्परचना, निसर्गाशी निगडीत देखावे, फुलपाखरांची छायाचित्रे यामधून नागरिकांच्या मनोरंजनासह ज्ञानात भर पाडणाऱ्या देखाव्यांची मेजवानी सादर केली असल्याची माहिती उपायुक्त (उद्यान) मनोहर बोडके यांनी दिली.
त्याचबरोबर प्रदर्शनामध्ये कुंड्यांमधील शोभिवंत पानांची झाडे (झुडुपे), कुंड्यातील शोभिवंत फुलझाडे, वामन वृक्ष, आमरी (ऑर्कीडस्) कुंडीतील वृक्ष, हंगामी फुले, दांडीसह (कट फ्लॉवर) इतर असे एकूण ३० विभाग व पोटविभाग आहेत. तसेच, यावर्षी लाईव्ह नेचर पेंटींग, तज्ज्ञांच्या सहाय्याने वृक्षावर यंत्राच्या मदतीने रोहण करण्याचे प्रात्यक्षिक, हेरिटेज ट्री ट्रेल ही प्रमुख आकर्षणे नागरिकांना अनुभवता येणार आहेत.
प्रदर्शनामध्ये उद्यान विषयक वस्तूंच्या विक्रीसह बांबूपासून बनविलेल्या वस्तू, नैसर्गिक खतांचा वापर करुन उत्पादीत भाज्या, हायड्रोफोनिक्स तंत्रज्ञान आदी ४० दालनांचा समावेश आहे. ‘वृक्षवल्ली-२०२५’ प्रदर्शनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या विविध स्पर्धांचा पारितोषिक वितरण समांरभ रविवार, १६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ होणार असल्याचे वरिष्ठ उद्यान अधिक्षक केदार पाटील यांनी सांगितले.