शासकीय विकासकामांचे ८९ हजार कोटी थकले !

* कंत्राटदारांचे काम बंद आंदोलन
* मंत्रालयावर जेसीबीसह काढणार मोर्चा

ठाणे : शासकीय कामांची जवळपास ८९ हजार कोटी रुपयांची थकबाकी असल्याचा आरोप करत ठाण्यातील सार्वजनिक बांधकाम विभागातील कंत्राटदारांनी काम बंद आंदोलनाला सुरुवात केली आहे.

राज्य अभियंता संघटना आणि महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ या दोन्ही संघटनांनी हा संप पुकारला आहे. राज्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका पार पडल्या आहेत. त्यामुळे या निवडणूक काळात योजनांचा आणि विकास कामांचा पाऊस पाडला गेला. प्रत्येक आमदाराला खुश करण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी देण्यात आला. विकास कामंही सुरु झाली. मात्र आता निधी वितरीत होत नसल्याने कंत्राटदार मात्र हैराण झाले आहेत.

या विकास कामांची जवळपास ८९ हजार कोटी रुपयांची थकबाकी वाढली आहे. त्यामुळे आज सर्व कंत्राटदारांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. राज्यात लाडकी बहीण योजनेमुळे तिजोरीत खडखडाट आहे. त्यामुळे हा निधी मिळत नसल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे विरोधकांनीही मोठ्या प्रमाणावर सरकारवर टीका केली आहे.

कंत्राटदारांनी सरकारला याचा जाब विचारत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आम्हाला आमचा निधी वर्ग करा असे साकडे घातले आहे. जर निधी वर्ग केला नाही तर जेसीबी, कामगार या सर्वांना घेऊन मंत्रालयावर मोर्चा काढून घेराव घालू, असा इशारा देखील ठाण्यातील कंत्राटदारांनी दिला आहे.