अंबरनाथ : शहरांच्या सांस्कृतिक जडणघडणीत वाचनालयांचे अनन्यसाधारण महत्व असून वाचनामुळे नवनवीन प्रेरणा मिळतात मत ज्येष्ठ साहित्यिक, संपादक कुमार केतकर यांनी व्यक्त केले.
अंबरनाथ नगरपालिका प्रशासक डॉ .प्रशांत रसाळ यांच्या संकल्पनेतून वाचनालय विभागातून साकारलेल्या शिवप्रेरणा ग्रंथालय, अभ्यासिका आणि साहित्य संशोधन केंद्राला कुमार केतकर यांनी सदिच्छा भेट दिली. पालिकेचे मुख्याधिकारी अभिषेक पराडकर यांनी केतकर यांचे स्वागत केले.
नगरपालिकेच्या माध्यमातून उभरलेल्या वाचनालयाला नागरिकांनी मोठ्या संख्येने येऊन वाचन संस्कृती जोपासावी, वाचनाने जीवनात अमुलाग्र बदल घडतात असे प्रतिपादन केतकर यांनी केले. ग्रंथालय चळवळीतील कार्यकर्ते विनायक गोखले यांनी श्री. केतकर यांच्याशी संवाद साधला. शाळेत विद्यार्थी असल्यापासून वाचनाची गोडी निर्माण झाली तिथपासून संपादक ते संसद सदस्य पर्यँन्त झालेल्या प्रवासाचे पैलू त्यांनी उलगडले. शिवप्रेरणा वाचनालयाला श्री. केतकर यांनी 500 पुस्तकांचा संच मुख्याधिकारी पराडकर यांच्याकडे सुपूर्द केला.
तपस्या नेवे यांनी सूत्रसंचालन केले, ग्रंथपाल अर्चना कर्णिक, ग्रंथसखाचे श्याम जोशी, कुलकर्णी तसेच पालिका अधिकारी संजय कुंभार, पंकज पन्हाळे, राजेश तडवी, आणि नागरिक याप्रसंगी उपस्थित होते. प्रशस्त जागेत असलेल्या वाचनालयात सुरू असलेल्या विविध उपक्रमांची पाहणी करून कुमार केतकर यांनी समाधान व्यक्त केले.