टीएमटीच्या तिकिटात मेट्रो-बेस्टचा प्रवास

लवकरच योजना कार्यान्वित

ठाणे: ठाणे परिवहन सेवेचे तिकीट मेट्रो आणि बेस्टमधेही चालणार असल्याने एकाच तिकिटावर ठाणेकरांना मुंबई महानगर प्राधिकरण हद्दीत प्रवास करणे सोपे जाणार आहे. पुढील एक-दोन महिन्यात ही योजना सुरु होण्याची शक्यता आहे.

ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी ही माहिती दिली आहे. ठाण्यातून दरदिवशी सुमारे दहा लाख प्रवासी प्रवास करतात. त्यांचा वेळ वाचवण्याच्या दृष्टीने एकत्रित परिवहन व्यवस्था करण्यात येणार आहे. मुंबई महानगर प्राधिकरण हद्दीतील सार्वजनिक वाहतूक विविध प्राधिकरणामार्फत चालवली जाते. त्याकरिता प्रवाशाला प्रत्येकवेळी वेगळे तिकीट काढावे लागते. त्यांचा वेळ वाचावा यासाठी मुंबई वनच्या धर्तीवर ही तिकीट योजना राबवली जाणार आहे. त्यासाठी एक ॲप तयार करण्यात आले असून मोबाईलवर त्या तिकीटाची सोय केली जाणार आहे. या ॲपला मेट्रो, बेस्ट, नवी मुंबई परिवहन, ठाणे परिवहन, कडोंमपा परिवहन, मीरा-भाईंदर आणि वसई-विरार महापालिका परिवहन विभाग जोडले जाणार आहेत. प्रवासी ज्या संस्थेचा वापर करेल त्यांना तिकीट हिस्सा मिळणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले.

ठाणे परिवहनकडे बसची संख्या कमी असल्याने त्याचा ताण वाहतूक व्यवस्थेवर पडतो, त्यामुळे नाइलाजाने ठाणेकर खाजगी वाहन वापरतात, असे देखिल आयुक्त राव यांनी सांगितले. याबाबत ठाणे परिवहनचे महाव्यवस्थापक श्री. बेहरे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की एक ॲप असणार आहे. त्याचे एक कार्ड देखिल प्रवाशाला मिळणार आहे. त्याची तयारी देखिल सुरु करण्यात आली असून या योजनेतील तिकिटांचा मोबदला थेट या योजनेकरिता काढण्यात आलेल्या बँक खात्यात जमा होणार आहे, असे स्पष्ट केले. या योजनेमुळे जास्तीत जास्त ठाणेकर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करतील, असा देखिल त्यांनी विश्वास व्यक्त केला.