मारहाणीत दुचाकीस्वाराचा मृत्यू
नवी मुंबई: खारघर परिसरात एका दुचाकीस्वाराने दुसऱ्या दुचाकीस्वाराला हुलकावणी दिल्याच्या रागातून डोक्यात जोरजोराने हेल्मेटने मारले. यात जखमी ४५ वर्षीय शिवकुमार शर्मा खारघर पोलीस ठाण्यात गेले असता त्या ठिकाणी ते बेशुध्द पडले. पोलिसांनी त्यांना पुढील उपचारासाठी नेले आता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
रविवारी रात्री साडेआठ वाजता खारघरमधील उत्सव चौकाजवळ दोन दुचाकीस्वार जात असता एका वाहनचालकाने हुलकावणी दिल्याने भांडण झाले. या रस्त्यावरुन जाणा-या इतर वाहनचालकांनी भांडणामध्ये मध्यस्थी न केल्याने भांडणाचे स्वरुप मारहाणीत झाले. हेल्मेटने वारंवार शिवकुमार यांच्या डोक्यात चारवेळा मारहाण केल्यामुळे ४५ वर्षीय शिवकुमार अत्यवस्थ झाले होते. खारघर पोलीस ठाण्यात या घटनेबाबत स्वतः शिवकुमार हे दुचाकी चालवून गेले. तेथे त्यांनी रितसर गुन्हा नोंदवला. गुन्हा नोंदवत असतं अचानक ते बेशुध्द होऊन खाली पडले. पोलिसांनी त्यांना उपचारासाठी दवाखान्यात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. शिवकुमार हे वाशी सेक्टर ९ मध्ये राहतात.
मारहाण करणारा २२ ते २५ वयोगटातील आरोपी फरार असून या आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांची १५ वेगवेगळी पथके कार्यरत असल्याची माहिती खारघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक दीपक सूर्वे यांनी दिली.