ठाणे: ठाणे खोपट, एसटी डेपोसमोर आज ठाणे शहर महाविकास आघाडीतर्फे एसटी महामंडळाच्या मनमानी भाडे दरवाढीविरुद्ध निषेध आंदोलन करण्यात आले.
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, धर्मराज्य पक्ष, शेकाप तसेच आप पक्षाचे बहुसंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते व महिला उपस्थित होत्या. बीजेपीच्या केंद्रीय व राज्य पातळीवरील चुकीच्या धोरणामुळे आज सर्वसामान्य जनता प्रचंड महागाईने होरपळली जात असून जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत. अशातच महाराष्ट्र सरकारने सुमारे १५ टक्के एसटी भाडे दरवाढ करून सर्वसामान्य जनतेला परवडणाऱ्या वाहतूक व्यवस्थेला काळे फासले आहे. त्या मुळे जनतेत प्रचंड असंतोष आहे. या असंतोषाला वाचा फोडण्यासाठी महाविकास आघाडीतर्फे केंद्रीय-राज्य स्तरावरील प्रशासनाविरुद्ध घोषणाबाजी करून निषेध व्यक्त करण्यात आला.
आंदोलन प्रसंगी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे केंद्रीय सरचिटणीस, माजी मंत्री आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड, ठाणे जिल्हा काँग्रेस अध्यक्ष ऍड विक्रांत चव्हाण, आपचे सतिज सलूजा, शेकापचे जिल्हा अध्यक्ष प्रसाद साळवी, युवक काँग्रेस अध्यक्ष ॲड.आशिष गिरी, राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष विक्रम खामकर, शिवसेना कोपरी पाचपाखाडीचे प्रमुख कृष्णा कोळी, शिवसेना महिला आघाडीच्या ज्योती ठाणेकर, स्मिता वैती, रमेश इंदिसे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
ही एसटी तिकिटावरील दरवाढ त्वरित रद्द व्हावी या संबंधीचे निवेदन राज्य वरिष्ठ पातळीवर निर्णय घेण्याच्या अनुषंगाने ठाणे जिल्हा एसटी डेपोचे व्यवस्थापक यांना महाविकास आघाडीतर्फे देण्यात आले.