हृदय विकाराने ग्रस्त बालकांची होणार मोफत शस्त्रक्रिया

* ११५ मुलांची टू डी इको तपासणी
* उप मुख्यमंत्री शिंदे आणि कुटुंबीयांचा वाढदिवसानिमित्त उपक्रम

ठाणे: हृदयाला छिद्र असलेल्या ११५ बालकांची मोफत टू डी इको तपासणी ज्युपिटर हॉस्पिटल येथे करण्यात आली असून गरज असलेल्या बालकांची मोफत शस्त्रक्रिया या रुग्णालयात करण्यात येणार आहे.

ठाणे शहरातील ज्युपिटर हॉस्पिटल येथे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि चि.रुद्रांश श्रीकांत शिंदे यांच्या संयुक्त वाढदिवसानिमित्ताने शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व ज्युपिटर हॉस्पिटल ठाणे आणि डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन तथा आरोग्यदुत फाउंडेशन यांच्यातर्फे हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

वर्षातून दोन वेळा या उपक्रमाचे आयोजन केले जात असून गेल्या आठ वर्षांपासून या आरोग्य शिबिराचे सातत्य राखण्यात शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशनला यश आले आहे. गेल्या आठ वर्षांत ज्युपिटर हॉस्पिटल, वाडिया हॉस्पिटल आदी रुग्णालयांच्या माध्यमातून आजपर्यंत लहान मुलांच्या पाच हजार शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडल्या आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खा.श्रीकांत शिंदे या दोन्ही नेत्यांच्या संयुक्त वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेले आजचे हे १६ वे आरोग्य शिबीर होते.

आज झालेल्या या शिबिरात तब्बल ११५ मुलांची टू डी इको तपासणी करण्यात आली असून शस्त्रक्रिया आवश्यक असलेल्या मुलांवर ज्युपिटर हॉस्पिटल येथे निःशुल्क शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. बुलढाणा येथून आलेल्या एका बाळाची शस्त्रक्रिया तत्काळ करणे आवश्यक असल्याने उद्याच करण्यात येणार असून बाळाला आजच दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती डॉक्टर टीमने माध्यमांशी बोलताना दिली.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कार्यक्रमाला व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थिती लावली. त्यांनी सर्व उपस्थितांना शुभेच्छा देत बालके लवकरात लवकर बरी व्हावीत यासाठी आई जगदंबे चरणी प्रार्थना केली.

या कार्यक्रमाला माजी आमदार शहाजी बापू पाटील, डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशनचे अध्यक्ष विलास जोशी आदी उपस्थित होते.