अंबरनाथ : अंबरनाथमध्ये भरवस्तीत भरदिवसा महिलेची चाकूने भोसकून निर्घृण हत्त्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. हत्त्येनंतर अवघ्या काही तासांत हल्लेखोराला ताब्यात घेण्यात आले आहे.
सीमा कांबळे (४२) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. या घटनेत हल्लेखोर आणि महिला दोघेही शिवमंदिर परिसरातील बारकुपाडा येथे राहण्यास असल्याची माहिती सहाय्ययक पोलीस आयुक्त शैलेश काळे यांनी दिली. दरम्यान अवघ्या काही तासांच्या आतच पोलिसांनी राहुल भिंगारकर या तरुणाला ताब्यात घेतले असून अटकेची कारवाई सुरू केली आहे.
शिवाजीनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत सीमाने राहुल यास पैसे दिले होते, मात्र राहुल भिंगारकर पैसे देण्यास टाळाटाळ करत होता, आज सोमवारी सीमा आणि राहुल हे पूर्व भागात उड्डाणपुलाजवळ यासंदर्भात बोलत असतांना त्यांच्यात कडाक्याचे वाद झाले. त्या वादातून राहुलने सीमाची चाकूने भोसकून हत्या केली. हत्त्या केल्यानंतर राहुल घटनास्थळावरून पसार झाला होता.
घटनास्थळी शिवाजीनगर पोलिसांनी धाव घेत तपास करत राहुल भिंगारकर यास ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात हत्त्येचा गुन्हा दाखल करून अटकेची कारवाई सुरू आहे, अशी माहिती सहायक पोलीस आयुक्त शैलेश काळे यांनी दिली.