रेल्वेची रांगोळी आणि पूर्वीच्या डी सी ट्रेनच्या भागांचे प्रदर्शन

वीजेवर धावणाऱ्या रेल्वेचे शतक महोत्सवी वर्ष

ठाणे: स्वप्नवत् वाटणारी बुलेट ट्रेन आता सत्यात उतरली असली तरी, भारतीय रेल्वेच्या गौरवशाली इतिहासाला आज १०० वर्षे पूर्ण झाली आहेत. आजच्या दिवशी बोरीबंदर ते कुर्ला या मार्गावर पहिली विजेवर चालणारी रेल्वे धावली होती. या शतक महोत्सवी वर्षानिमित्त ठाणे रेल्वे स्थानकात एका छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन केले होते, यावेळी विजेवर धावणाऱ्या डी सी ट्रेनचे भाग (मशीनचे) प्रदर्शन, रांगोळी, सेल्फी पॉइंट आदी ठेवण्यात आले होते

१६ एप्रिल १८५३ रोजी मुंबई ते ठाणे दरम्यान धावलेली आशियातील (आणि भारतातील) पहिली ट्रेन बोरीबंदर (सध्याचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस) येथून रवाना झाली. जसजशी वर्षे निघून गेली, तस तसे रेल्वेचे जाळे भारतभर पसरले आहे. जगात चौथ्या क्रमांकाचे भारतीय रेल्वेची गणना होत असून, ३ फेब्रुवारी १९२५ रोजी वीजेवर धावणारी पहिली ट्रेन बोरीबंदर ते कुर्ला या दरम्यान धावली होती. या ऐतिहासिक दिवसानंतर रेल्वेचा विस्तार झपाट्याने वाढलेला बघायला मिळतो आहे. वीजेवर धावणाऱ्या रेल्वेचा आज शतक महोत्सव रेल्वे साजरा करत आहे. या निमित्ताने ठाणे स्थानकात जुन्या रेल्वेच्या काही आठवणीत राहणारी सामुग्री प्रदर्शनात ठेवली असल्याची माहिती ठाणे रेल्वे व्यवस्थापक केशव तावडे यांनी दिली.

ठाणे स्थानकातील रेल्वे व्यवस्थापक यांच्या कार्यालयाच्या परिसरात एक छोट प्रदर्शन ठेवले आहे. यामध्ये पूर्वीच्या विजेवर धावणाऱ्या ट्रेनचे काही भाग प्रवाशांना पहाण्यासाठी ठेवले आहेत. तसेच रेल्वेची सुबक रांगोळी या ठिकाणी काढली असून, प्रवाशांसाठी रेल्वेचा खास सेल्फी पॉइंट देखील या ठिकाणी ठेवला होता. या प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी वरिष्ठ मण्डल विद्युत अभियंता अर्शद आलम खान, सहाय्यक विद्युत मंडल अभियंता दीपक कारेकर, रेल्वे व्यवस्थापक केशव तावडे, सहाय्यक सुरक्षा आयुक्त अतुल क्षीरसागर, वरिष्ठ निरीक्षक रेल्वे सुरक्षा बल सुरेंद्र कोष्टा आदी मान्यवर उपस्थित होते.

१९२५ मध्ये पहिली वीजेवर धावणारी चार डब्यांची हार्बर ट्रेन धावली. त्यानंतर १९२७ साली आठ डबे मेन लाईन आणि हार्बर मार्ग, १९६१ मध्ये मेन लाईनवर नऊ डबे, १९८६ मध्ये १२ डबे मेन लाईन, २०१२ मध्ये १५ डबे आणि २०२० मध्ये वातानुकूलित रेल्वे धावली होती.