अधिकाऱ्यांना पूर्वकल्पना न देता शहरात आयुक्तांचा पाहणी दौरा

नवी मुंबई : स्वच्छतेमधील नवी मुंबई शहराचे मानांकन उंचावण्यासाठी विविध मोहीमा, उपक्रम राबवत सर्व स्तरावरुन प्रयत्न केले जात असताना महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार नुकत्याच आठही विभागांमध्ये महामार्ग, मुख्य रस्ते, वर्दळीची ठिकाणे, दुर्लक्षित जागा याठिकाणी सखोल स्वच्छता मोहीमा राबविण्यात आल्या.

या मोहीमांतर्गत रस्ते, पदपथ, दुभाजक यांच्या कडेला जमा झालेली माती गोळा करुन हवेतील धूळीचे प्रमाण कमी करण्याकडे विशेष लक्ष देण्यात आले. या अनुषंगाने महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी प्रत्यक्ष फिल्डवर उतरुन पाहणी करण्यास सुरुवात केली असून आज त्यांनी ऐरोली विभागातील मुख्य रस्ते व प्रामुख्याने एमआयडीसी भागातील रस्ते तसेच स्वच्छता, डेब्रिज, दुभाजक, आयलँड, रस्त्याच्या साईडपट्टया अशा विविध बाबींची पाहणी केली. विशेष म्हणजे ही पाहणी त्यांनी सायकलवरुन केली.

चारचाकी गाडीने जाताना वेगामुळे काही वेळा प्रत्यक्ष स्थितीचा अंदाज येत नाही, त्यामुळे सायकलसारखे पर्यावरणपूरक वाहन वापरुन शहरातील स्थितीचा आयुक्त कार्यालयीन वेळीच्या आधी सकाळी लवकरच नियमित आढावा घेत असतात. आज त्यांनी संबधित अधिका-यांना घेऊन कोणत्या भागाची पाहणी करणार याची पूर्वकल्पना न देता ऐनवेळी सांगत ऐरोली भागाची पाहणी केली.

शहरातील मुख्य रस्ते हे आपल्या शहराचा आरसा असून खड्डेमुक्त रस्त्यांसाठी आवश्यक तेथे सुधारणा तसेच त्यावरील माती उचलून हवा गुणवत्तेत सुधारणा करणे व स्वच्छता व सुशोभिकरण हे आपले प्राधान्य असले पाहिजे असे निर्देश देत केवळ पाहणी केलेल्या भागाची नाही तर शहरातील सर्वच भागांची दिलेल्या सूचनांनुसार सुधारणा तत्परतेने हाती घ्यावी असे स्पष्ट निर्देश आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी यावेळी दिले.

या दौ-यात त्यांच्या समवेत शहर अभियंता शिरीष आरदवाड, परिमंडळ 2 चे उपआयुक्त डॉ. कैलास गायकवाड, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे परिमंडळ 2 चे उपआयुक्त संतोष वारुळे, ऐरोली विभागाचे सहायक आयुक्त अंकुश जाधव, कार्यकारी अभियंता मदन वाघचौडे, मनोहर सोनावणे, प्रवीण गाडे व इतर अधिकारी उपस्थित होते.