राज ठाकरे यांचे संकेत
मुंबई : पक्षात वरपासून खालपर्यंत शिस्त येण्यासाठी एक आचारसंहिता तयार करण्यात येणार आहे. जे मी वरील पातळीवर बोलेल ते शाखाप्रमुख आणि पदाधिकाऱ्यांना आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांना देखील कळायला हवे, असे मत राज ठाकरे यांनी मांडले.
आज मुंबईत राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात त्यांनी विविध मुद्द्यांवर मते मांडताना पक्षांतर्गत बदलाबाबत माहिती दिली. ते म्हणाले, पक्षात नेमके काय सुरू आहे, हे सर्वांना समजायला हवे. कदाचित काही पदांची नावे देखील बदलली जाणार असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.
लहानपणापासून मी लहान मोठे अनेक पराभव पाहिले आहेत. तसेच अनेक विजय देखील पाहिले आहे. मी पराभवाने कधी खचलो नाही. तर विजयाने हरखून देखील गेलो नाही. विजयाने कधी हुरळून गेलो नाही, खचलेल्या, पिचलेल्या, लोकांचं मला नेतृत्व करायचं नाही. माझ्यासोबत राहायचे असेल तर ठाम राहा, अशा शब्दत राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साह, जोष आणि नवचैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. जे आपल्याला महाराष्ट्रात करायचे आहे, जे महाराष्ट्रातील मराठी माणसासाठी करायचे आहे, ते आपण करणारच आहोत, असंही राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. आज नाही, उद्या नाही तर परवा करु, मात्र ते होणार म्हणजे होणारच, हे लक्षात ठेवा, असा ठाम विश्वास राज ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.
राज ठाकरे भूमिका बदलतात, असं नेहमी म्हटलं जातं. मी पदाधिकाऱ्यांशी बोललो, भूमिका बदलणं कशाला म्हणतात. हे तुम्हाला माहीत आहे का? राज्यात लोकांनी कशा भूमिका बदलल्या आणि आपण काय केलं हे सांगतो, सर्वांनी आपल्या स्वार्थासाठी भूमिका बदलल्या. मी कोणत्या भूमिका बदलल्या? आता जर तुम्ही मंत्रिमंडळातील लोकं बघितली तर बहुतेक शिवसेना आणि काँग्रेसचे आहेत. त्यांचं सरकार आहे. त्यांना विचारणार नाही. पण तुमच्या कानात हे ऐकवणार की भूमिका बदलली, भूमिका बदलली, असं म्हणत आत्तापर्यंत नेत्यांनी बदलेल्या भूमिकेवर राज ठाकरेंनी स्पष्टपणे आपलं मत मांडलं आहे.
राज ठाकरे यांनी निवडणुकीबाबत संशय व्यक्त करताना काही दाखलेही दिले. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात सात वेळा आमदार होते. 70 हजारांचा लीड असायचा आणि यंदा 10 हजारांनी पडले. जे निवडून येऊन सत्तेत बसले आहेत, ते ही बोलत आहेत. उद्या लोक म्हणतील राज ठाकरे पराभव झाला म्हणून बोलत आहेत. अजित पवार पक्षाच्या 42 जागा आल्या आणि ज्यांच्या जीवावर यांनी राजकारण केले, त्या शरद पवार यांना 10 जागा जिंकता आल्या. लोकसभेला काँग्रेसने सर्वात जास्त खासदार निवडून आणले. शरद पवार साहेबांचे आठ खासदार असून 10 आमदार निवडून आले. ज्या अजित पवार यांचे एक खासदार आले त्यांचे 42 आमदार कसे निवडून आले? भाजपला 132 जागा मिळाल्या हे समजू शकतो, पण अजित पवार 42 जागा ? 4 ते 5 जागा येतील की नाही असे वाटणाऱ्यांना 42 जागा? आणि ज्यांच्या जीवावर यांनी राजकारण केले त्या शरद पवार यांना इतक्या कमी जागा कशा ? असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे. निवडणुकीचा निकाल लागल्यावर ज्या दिवशी निकाल लागला, त्या दिवशी मी महाराष्ट्रात पहिल्यांदा पाहिलं महाराष्ट्रात सन्नाटा पसरला होता. माझ्याकडे एक व्यक्ती आली होती. ती व्यक्ती संघाशी संबंधित होती. त्यांच्याही मनामध्ये मला दिसलं त्यांना हे पटलेलं नाही. त्यांनी फार छान वाक्य माझ्यासमोर बोलले. मला म्हणाले इतना सन्नाटा क्यू है भाई. कोई तो जीता होगा कोणीतरी जिंकला असेल ज्याच्यातून जल्लोष होईल. पण महाराष्ट्रामध्ये जो सन्नाटा पसरला हे कसलं द्योतक आहे. काही काही गोष्टींवर विश्वासच बसू शकत नाही, असा पुढे राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
निवडणुकीला उशीर, मोफत सहलींना आवर घाला
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत होणारा निर्णय आता न्यायालयाने २८ फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलला आहे. त्यामुळे महापालिका निवडणुका ऑक्टोबर नोव्हेंबरमध्येच होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पदाधिकाऱ्यांनी आतापासूनच नागरिकांना मोफत सहली, देवदर्शन असे उपक्रम घेऊ नयेत. नाहीतर निवडणुका येईपर्यंत हात रिकामे व्हायचे, असा सल्लाही राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिला.