ई चलन बजावले; २४५ कोटी थकले!

सहा वर्षांत दंडाचे ‘ट्रॅफिक जाम’

ठाणे : ठाणे वाहतूक पोलिसांकडून वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांच्या विरोधात ई चलन बजावलेल्या दंडाची गेल्या सहा वर्षातील थकीत रक्कम २४५ कोटी ८३ लाखांच्या घरात पोचली आहे. या दंडाची वसुली करण्याचे मोठे आव्हान वाहतूक शाखेपुढे उभे राहिले आहे.

गेल्या सहा वर्षांत ई चलनच्या माध्यमातून एकूण ५१ लाख ४४ हजार प्रकरणे करण्यात आली असून दंडाची एकूण रक्कम ३३८ कोटी ६९ लाख एवढी होती. यापैकी केवळ ९२ कोटींचाच दंड वाहनचालकांनी भरला आहे. दुसरीकडे दंड वसुलीसाठी दबाव टाकू नये असे निर्देश असल्याने ठाणे वाहतूक पोलिसांना हा दंड वसूल करण्यासाठी कठोर पाऊले उचलता येत नाहीत. परिणामी प्रत्येक वर्षी ही दंडाची थकीत रक्कम वाढतच असून २४५ कोटींची ही दंडाची थकीत रक्कम वसूल करायची कशी? असा मोठा प्रश्न ठाणे वाहतूक पोलिसांच्या समोर उभा राहिला आहे.

नियमभंग केल्याप्रकरणी ठाणे वाहतूक पोलिसांकडून २०१९ पासून २०२४ अशा सहा वर्षांत ५१ लाख ४४ हजार प्रकरणे दाखल करण्यात आली आहेत. यामध्ये हेल्मेट न घालणे, ओव्हर सीट, कागदपत्रे नसणे, वाहतुकीचे नियम न पाळणे अशा अनेक गोष्टींचा समावेश आहे. गेल्या सहा वर्षांतील ही दंडाची रक्कम जवळपास ३३८ कोटी ६९ लाखांच्या घरात आहेत. मात्र वसुलीसाठी वाहन चालकांवर कोणत्याही प्रकारचा दबाव टाकता येत नसल्याने किंवा वाहन जप्तीचे अधिकार नसल्याने केवळ आवश्यक असलेल्या ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाचा दंड वाहन चालकांकडून भरण्यात येतो. वाहतूक पोलिसांनी ई चलनच्या माध्यमातून ठोठावलेला दंड भरण्यास वाहन चालकांकडून टाळाटाळ करण्यात येत असल्याने ३३८ कोटी दंडाच्या रकमेपैकी केवळ ९२ कोटींचा भरणा या सहा वर्षांत भरण्यात आला आहे. त्यामुळे अजूनही २४५ कोटींची थकीत रक्कम असून प्रत्येक वर्षी ही थकीत रक्कम वाढतच असल्याचे उघड झाले आहे.

ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत ठाणे वाहतूक पोलिसांचे १८ विभाग कार्यरत आहे. वाहनांनी कुठे, कधी आणि कशा पद्धतीने वाहतूक नियमांचे उल्लंघन केले आहे याची सविस्तर माहिती ई चलनच्या पोर्टलवर उपलब्ध असते. तिथेच दंडाची रक्कमही दिलेली असते. ती भऱण्यासाठी चार वेगवेगळे पर्याय उपलब्ध असून वाहन चालकांकडून मात्र त्याचा वापर केला जात नाही.

गेल्या सहा वर्षातील ई चलन आणि दंडाची रक्कम

वर्ष ई चलन(केसेस) दंडाची रक्कम(कोटींमध्ये) भरलेला दंड (कोटींमध्ये ) थकीत रक्कम (कोटींमध्ये )
२०१९ ६,२६२३६ २०३,९,१४,५०० १२४,०४,४,९०० ७९,८६,९,६००
२०२० ६,६८,५८२ २६५,८२,५,७५० १२८,५९,२५,५०० १३७,२,३३,२००
२०२१ ९५,३,९८४ ३७८,०२,०२५० १६६,४,१३,२५० २११,६,०७०००
२०२२ ८७,८,६९३ ६७१,५,८६,६०० २१२,६५,२,८५० ४५८,९,३३,७५०
२०२३ ९५,४,५१० ८१०,३,५८००० १८६,१,७७,४०० ६२४,१८,०६००
२०२४ १०,६२,७४७ १०५,७१,९७,९०० ११०,६,८२,६०० ९४६,५,१५,३००
एकूण ५१,४४,७५२ ३३८,६९,०३००० १९,०८,७४० २४५,८३,३९,४५०