लोकसहभागातून होणार उद्यानाचा पुनर्विकास

* आमदार संजय केळकर यांची संकल्पना

ठाणे : लोकसहभागातून नाले दत्तक योजना यशस्वी झाल्यानंतर आमदार संजय केळकर यांच्या संकल्पनेतून नौपाडा येथील महापालिकेच्या दुरावस्था झालेल्या उद्यानाचा पुनर्विकास लोकसहभागातून करण्यात येणार आहे. या कामाचे भूमिपूजन श्री.केळकर यांच्या हस्ते आज करण्यात आले.

नौपाडा येथील सहयोग मंदिरासमोरील ठाणे महापालिकेचे घाणेकर उद्यान असून सध्या ते दुरावस्थेत आहे. सुमारे साडेपाच हजार चौरस फुटाचे क्षेत्रफळ असलेल्या या उद्यानात गवत निघून गेले असून काही खेळणी नादुरुस्त आहेत. नवीन आराखड्यानुसार प्रवेशद्वाराचे नूतनीकरण करण्यात येणार असून नवीन साहित्य आणि खेळणी ठेवण्यात येणार आहे. गवत वाढवण्यात येणार असून आणखी नवीन झाडांचे आणि शोभिवंत रोपांचे रोपण करण्यात येणार आहे. सुरक्षेच्या दृष्टीने लहान मुलांसाठी कोपऱ्यात खेळणी घर तयार करण्यात येणार आहे. ओपन जिम, साऊंड सिस्टीम आदी सुविधा देण्यात येणार असून नवीन उद्यान लहानांपासून ज्येष्ठांना ऊर्जा देणारे आणि मनोरंजन करणारे ठरेल, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

आमदार संजय केळकर यांच्या संकल्पनेतून यापूर्वी मासुंदा तलावाजवळ लालबाग परिसरात लोकसहभागातून नाले दत्तक योजना यशस्वीपणे राबवण्यात आली होती. याकामी पुढाकार घेणारे सुप्रसिद्ध विकासक महेश बोरकर हे उद्यानाचा पुनर्विकास करणार आहेत.

ठामपा प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे विविध वास्तूंची झालेली दुरावस्था दूर करण्यासाठी ठाणे शहरातील नामवंत उद्योजकांनी योगदान देऊन नागरिकांची गैरसोय दूर करावी, असे आवाहन आमदार संजय केळकर यांनी यावेळी केले.

भूमिपूजनाप्रसंगी आमदार संजय केळकर यांच्यासह स्थानिक माजी नगरसेवक सुनेश जोशी, मृणाल पेंडसे, प्रतिभा मढवी, भाजपचे ठाणे शहर उपाध्यक्ष डॉ.राजेश मढवी, विकासक महेश बोरकर, नंदिनी बोरकर आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.