राज्यातील सर्वात स्वच्छ-सुंदर बसस्थानकाला एक कोटी

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान राबविणार

मुंबई: स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त पुढील वर्षभर एसटीच्या राज्यभरातील सर्व बसस्थानकांवर शिवसेना पक्षनेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान राबवण्यात येणार आहे. तब्बल तीन कोटी रुपयांची बक्षिसे या अभियानांतर्गत वाटण्यात येणार असून राज्यात ‘ अ ‘ वर्गात प्रथम येणाऱ्या बसस्थानकाला एक कोटीचे बक्षीस जाहीर करण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

या अभियानाचा शुभारंभ उद्या २३ जानेवारी रोजी मंत्री सरनाईक यांच्या हस्ते कुर्ला नेहरूनगर बस स्थानकावर होणार आहे. यानिमित्ताने सर्व राज्यभर प्रत्येक बसस्थानकावर शालेय विद्यार्थी, सामाजिक संस्था व एसटी कर्मचाऱ्यांच्या सहकार्यातून सखोल स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे.

वर्षभर चालणाऱ्या या अभियानामध्ये दर तीन महिन्यांनी प्रत्येक बसस्थानकाचे मूल्यमापन होणार आहे. त्यासाठी एस.टी. महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली परीक्षण समित्या नेमण्यात आल्या असून त्यांनी दिलेल्या गुणांच्या आधारे सरासरीद्वारे बस स्थानकाचे क्रमांक निश्चित करण्यात येतील. राज्यभरात एसटीच्या असलेल्या सर्व बस स्थानकाचे तेथील प्रवासी चढ-उतार संख्येच्या आधारे शहरी ‘ अ ‘ वर्ग, निमशहरी ‘ ब ‘ वर्ग व ग्रामीण ‘ क ‘ वर्ग अशा तीन गटांमध्ये विभागणी केलेली आहे. प्रथम प्रादेशिक स्तरावर प्रत्येक गटनिहाय पहिला, दुसरा आणि तिसऱ्या क्रमांकासाठी स्पर्धा रंगणार असून अंतिम स्पर्धा राज्यस्तरावर घेण्यात येईल. त्यासाठी प्रत्येक प्रादेशिक स्तरावर गटनिहाय पहिला आलेल्या बसस्थानकाचा विचार केला जाणार आहे.

राज्यपातळीवर ‘ अ ‘वर्ग गटातून पहिला येणाऱ्या बसस्थानकाला १ कोटी रुपये ‘ ब ‘ वर्ग गटातून पहिला येणाऱ्या बसस्थानकाला ५० लाख रुपये तर ‘ क ‘ वर्ग गटातून पहिला येणाऱ्या बसस्थानकाला २५ लाख रुपये इतक्या रकमेची बक्षिसे देण्यात येणार आहेत.