२६ तासांत पार केले १६१ किमी अंतर
ठाणे : अल्ट्रा मॅरॅथॉन स्पर्धेत अनेक विक्रम प्रस्थापित झाले, परंतु 100 मैल म्हणजे 161 किमी या सर्वोच्च श्रेणीमध्ये डोंबिवलीचा रहिवासी संचित त्रिपाठी या 20 वर्षीय युवकाने 26 तासांत हे अंतर विश्रांती न घेता पूर्ण केले. या कामगिरीमुळे तो भारतातील सर्वात तरुण अल्ट्रा मॅरेथॉन धावपटूंपैकी एक ठरला आहे.
अल्ट्रा मॅरेथॉन ही भारतीयांमध्ये प्रचंड लोकप्रिय स्पर्धा आहे. राजस्थानमध्ये आयोजित “द हेल रेस” (द बॉर्डर रन) या स्पर्धेला उत्तम प्रतिसाद मिळाला. ही मॅरेथॉन 14 डिसेंबर 2024 रोजी जैसलमेरपासून लोंगेवालापर्यंत आयोजित केली गेली होती. 1971 साली पाकिस्तानविरुद्धच्या लोंगेवाला युद्धामध्ये लढलेल्या सैनिकांना श्रद्धांजली म्हणून ही मॅरेथॉन आयोजित केली जाते. भारतातील सर्वात कठीण अल्ट्रा मॅरेथॉनपैकी एक म्हणून ती ओळखली जाते
संचित सध्या डॉन बॉस्को कॉलेज, कुर्ला येथे तृतीय वर्ष बीएमएस वर्गात (टीवाय बीएमएस) शिकत आहे. त्याने 2022 साली धावण्यास सुरुवात केली आणि अवघ्या दोन वर्षांत हे मोठे यश मिळवले. “पलावा रनर्स” नावाच्या धावपटूंच्या समुदायाशी जोडलेला असल्यामुळे त्याने या मॅरेथॉनसाठी कठोर प्रशिक्षण घेतले. दिवसाचे तापमान २५ अंश सेल्सिअस आणि रात्रीचे तापमान ४ अंश सेल्सिअस अशा प्रतिकूल वातावरणात त्याने तयारी केली. प्रशिक्षणात झालेल्या अतिताणामुळे त्याच्या मांडीला इजा झाली होती. त्यामुळे स्पर्धेदरम्यान अनेक अडचणी निर्माण झाल्या. 158 किमी अंतर कापल्यानंतर तो निर्जलीकरण आणि इजेमुळे रस्त्यावर कोसळला, परंतु पुन्हा त्याने मानसिक आणि शारीरिक अशा सर्व अडथळ्यांवर मात करत शेवटी विजय मिळवला.
त्याच्या कुटुंबाच्या पाठिंब्यामुळे आणि धावपटूंच्या समूहाने दिलेल्या मार्गदर्शनामुळे त्याने इतक्या कमी वयात हा मान मिळवला. दुखापतीसह स्पर्धेत सहभागी झालेल्या संचितने मॅरेथॉन पूर्ण करत भारतीय मॅरेथॉन विश्वासाठी एक नवा आदर्श प्रस्थापित केला आहे.