खा. म्हस्के यांची आव्हाडांवर टीका

ठाणे: अभिनेता सैफ अली खान याच्यावर हल्ला झाल्यानंतर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सैफ आणि करिना यांनी आपल्या बाळाचे नाव तैमूर ठेवल्याने तो कट्टरपंथीयांचा लक्ष्य झाला होता अशी तोफ ट्विट करून डागली होती. मात्र हल्लेखोर हा बांगलादेशी निघाल्यानंतर शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी आव्हाड यांच्या या ट्विटवर सडकून टीका केली आहे.
सतत धर्म, जात, पंथ यात लोकांना फोडायचे, वर पुरोगामित्वाचे कातडे अंगभर ओढायचे अशी टीका म्हस्के यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर केली आहे. ज्यावेळी हल्ला झाला तेव्हा कोणताही विचार न करता आपण कसे पुरोगामी आहोत हे दाखवण्यासाठी जितेंद्र आव्हाड यांनी या प्रकरणाला धार्मिक रंग दिला. हा हल्ला हिंदू धर्मियांनी केला असावा असा आरोप त्यांच्याकडून होतो. यामागे आपणच मुस्लिमांचे कैवारी आहोत असे दाखवयाचे आहे कि आव्हाड यांना हिंदू-मुस्लिम यांच्यात दंगे घडवायचे आहेत, असा प्रश्न म्हस्के यांनी उपस्थित केला. मिळालेला आरोपी हा बांग्लादेशी निघाला असून आता आव्हाड यांची भूमिका काय हे आव्हाड यांनी जाहीर करावे, असे आव्हान म्हस्के यांनी आव्हाड यांना दिले.