‘नमो’ जोगिला !

टीका करणे हे पत्रकार म्हणून माझे कर्तव्य आहे, यात वाद नाही. परंतु विनाकारण टीका करणे आदर्श पत्रकारितेत मोडत नाही. म्हणून मीच काय माझ्यासारखे अनेक व्यवसायबांधव अशा टीकेपासून दोन हात दूरच राहतात. पत्रकारितेमधील उरली-सुरली विश्वासार्हता अशा पत्रकारांमुळे शिल्लक आहे. विधायक टीका किंवा सूचना करणाऱ्या पत्रकारांचे प्रशासन आणि राज्यकर्ते यांनी ऐकावे ही किमान अपेक्षा असते. ते बरेचदा ऐकत नाहीत ही बाब अलाहिदा.आज आम्ही जो विषय घेतला आहे त्याबद्दल ही अपेक्षा नक्कीच असणार आहे. आम्हाला खात्री आहे की प्रशासन आणि राजकारणी, जे खरोखरीच या शहरावर प्रेम करीत असतील तर ते या लेखाची दखल घेतील.
नमनाला घडाभर तेल, असा काहीसा प्रकार झाला आहे. हे लक्षात घेऊन आम्ही थेट विषयांत हात घालतो. तर विषय असा होता की दोन दिवसांपूर्वी आम्हाला अखेर ठाणे महापालिकेने एका नामवंत बांधकाम-व्यावसायिकाच्या मदतीने साडे आठ एकरांवर एक अत्यंत देखणे उद्यान कोलशेतजवळ उभे केले आहे. ‘नमा’ उद्यान असे नामकरण झालेल्या प्रकल्पाला पंतप्रधानांची अद्याक्षरे जोडली गेल्यामुळे त्यास बाधा येईल अशी कोणतीही कसर सोडली गेलेली नाही. सौंदर्याला आधुनिकतेचे कोंदण, पर्यावरणाबद्दलचा समग्र विचार, उद्यानास भेट देणाऱ्या नागरिकांची गैरसोय न होता त्यांच्या आनंदात भर कशी पडेल आणि जाताना ते एक अविस्मरणीय अनुभव कसा घेऊन जातील याची काळजी आम्हाला फेरफटका मारताना जागोजागी जाणवली. या प्रकल्पासाठी सुमारे ८० कोटी रुपये खर्च आला आणि तो पूर्णपणे बिल्डरने उचलला. त्या मोबदल्यात त्याच्यावर महापालिकेने किती मेहेरबानी केली यावर चर्चा करण्यात काही लोकांना विशेष रस असेलही, परंतु असा खर्च न करताही मेहेरबानी कशी मिळवायची हे ठाऊक असणार्‍या निदान या बिल्डरने टाळले. त्याबद्दल त्याचे कौतुक. जनसहभाग किंवा व्यावसायिकदृष्टया (पीपीपी प्रायव्हेट पब्लिक पार्टनरशिप ) पद्धतीने खाजगी आस्थापनेला कसे सामावून घेता येईल, त्याचे ‘नमो’ एक उत्तम उदाहरण ठरते.
आता आपण हे ‘नमो’ पॅटर्न अन्यत्र कुठे लागू करता येईल याचा विचार करु या. किंबहुना तोच हा लेख लिहिण्यामागचा हेतू आहे. ज्या ठाणे शहराचा उल्लेख ‘तलावांचे शहर’ म्हणून आपण करतो तिथे ४२ तलावांच्या जागी आता जेमतेम १६ तलाव राहिले आहेत, हे किती ठाणेकरांना ठाऊक आहे? मासुंदा, मखमली, ब्रम्हाळा, कचराळी, सिद्धेश्वर,रायलादेवी, घोसाळे, खारेगाव, खिडकाळेश्वर वगैरे तलावांच्या पुढे सार्वजनिक स्मरणशक्ती जात नाही. अशाच तलावांमध्ये उथळसर भागातील जोगिला तलावाचे नाव आठवून बघा. होय, हाच तो तलाव जो गेली चार वर्षे सुशोभीकरणाच्या नावाखाली चारही बाजूंनी पत्रे लावून लपवण्यात आला आहे. या तलावाचे काम का थांबले, याचा खुलासा महापालिकेला आजपावेतो इतक्या वेळा तक्रारी करुनही करण्याची इच्छा झाली नाही. अशा लोकांना तरीही आठवा वेतन आयोग मिळणार आहे, बरे का? या लेखानंतर तरी जोगिलाबाबत खुलासा आणि अर्धवट राहिलेले काम जलद गतीने पूर्ण होईल ही अपेक्षा आहे. असो.
टीका करुन थांबणे हे ‘ठाणेवैभव’चे धोरण नसते. त्यामुळे आम्ही ‘नमो’ची फूटपट्टी जोगिलासाठी का वापरली जाऊ नये हा प्रश्न आम्ही उपस्थित करीत आहोत. जोगिलाचे क्षेत्रफळ जेमतेम अडीच कि.मी. म्हणजेच नमोच्या पाव पट. त्यामुळे हे अर्धवट काम पूर्ण करण्यासाठी खर्चही कमी येणार. त्यात पुन्हा हे उद्यान नाही. निम्म्यापेक्षा जादा जागा पाण्याने व्यापणार. म्हणजे जेमतेम १०-१२ कोटींचा खर्च होईल. ही जबाबदारी महाराष्ट्र चेंबर ऑफ हाऊसिंग इण्डस्ट्री (एमसीएचआय)च्या ठाणे शाखेने घ्यायला काय हरकत आहे? दरवर्षी गृहप्रदर्शन भरवून एमसीएचआय ठाण्याकडे लोकांचे लक्ष वेधत असते. अनेकदा त्यांनी महापालिका आणि जिल्हा प्रशासनाला काही सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. एमसीएचआयच्या पदाधिकार्‍यांनी या खेपेस किमान पाच तलावांची जबाबदारी घ्यावी आणि बिनदिक्कतपणे त्यांच्या जाहिरातीत ठाण्याचे तलावपण जपण्याचे श्रेय घ्यावे. बघू या, ही सर्व मंडळी शहराकडे किती गांभीर्याने पहातात ते !